आट्यापाट्या

971

बाळ तोरसकर

संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वर्णनावरून आटय़ापाटय़ा हा खेळ त्या काळी प्रचलित होता याची प्रचीती येते. मुंबईतसुद्धा काही वर्षांपूर्वीपर्यंत होळीच्या वेळी हा खेळ रस्त्यांवर चुन्याने रेषा मारून खेळला जात असे.

‘आटय़ापाटय़ा’ हा मराठी मातीत खेळला जाणारा अतिशय चपळ व वेगवान असा खेळ आहे. हा खेळ देशभर अनेक राज्यांत खेळला जात असला तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळास ओळख मिळवून देण्यासाठी आटय़ापाटय़ातील क्रीडा कार्यकर्ते जिवापाड प्रयत्न करत आहेत. त्यासाठी खेळातील तंत्रात व नियमात बदल करून अधिक सोप्या पद्धतीने लोकांसमोर हा खेळ आणला आहे. पन्नास-साठीतील लोकांना आटय़ापाटय़ा म्हटलं की, आपल्याला आपले शालेय बालपण नक्कीच आठवेल. लहानपणी आपण हा खेळ नक्कीच खेळला किंवा पाहिला असेल. आटय़ापाटय़ामध्ये एका संघातील खेळाडू दुसऱया संघातील खेळाडूंना ठरावीक पाटीत अडवणूक करतात व बाद करण्याचा प्रयत्न करत असतात, तर त्याचवेळी दुसऱया संघातील खेळाडू बचाव करत हुलकावणी देऊन निसटून जाण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच या खेळात खेळाडूची कोंडी करणे, हुलकावणी देणे, पाठशिवी करणे या तंत्रांचा वापर होत असतो.

हा अतिशय प्राचीन खेळ असून हिंदुस्थानात तो वेगवेगळय़ा राज्यांमध्ये वेगवेगळय़ा नावाने खेळला जात होता. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील वर्णनावरून आटय़ापाटय़ा हा खेळ त्या काळी प्रचलित होता याची प्रचीती येते. आटय़ापाटय़ा खेळ भरपूर धाडसी व रोमहर्षक असून हा खेळ खेळताना भरपूर व्यायाम होतो. तसेच या खेळात प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक चापल्य दाखवावे लागतेच व

त्याचबरोबर सांघिक कौशल्य दाखवताना अतिशय उच्च कोटीचा समन्वय राखावा लागतो. निर्णय क्षमता पणाला लावणारा हा खेळ अतिशय उत्कृष्ट शारीरिक व्यायाम प्रत्येक खेळाडूला मिळवून देतो व त्याचबरोबर शारीरिक व मानसिक संतुलनाचे दर्शनसुद्धा या खेळात होते.

आटय़ापाटय़ाचे क्रीडांगण हे एक उभी पाटी (सुरपाटी) व इतर नऊ आडव्या पाटय़ांमध्ये (संरक्षण पाटी) विभागलेले असते. ज्या आडव्या पाटय़ा असतात त्यांची लांबी २३ फूट १ इंच तर रुंदी १३ इंच असते व या सर्व पाटय़ांना समान दोन भागांत विभागणाऱया उभ्या ७-७ मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. दोन डावांमध्ये ५ मिनिटांची विश्रांती तर दोन पाळींमध्ये ३ मिनिटांची विश्रांती दिली जाते. प्रत्येक संघातून ९ खेळाडू खेळतात. डावाला सुरुवात झाल्यावर पहिल्यांदा ५ जणांची पहिली तुकडी पाळायला सुरुवात करते. (पूर्वी सर्व खेळाडू एकाच वेळेला धावत असत व त्यामुळे गोंधळ उडत असे म्हणून आता दोन तुकडय़ा केल्या आहेत) तर प्रतिस्पर्धी ९ खेळाडू त्यांची अडवणूक करून बाद करण्याचा प्रयत्न करत असतात. पहिली तुकडी बाद झाल्यावर ४ जणांची दुसरी तुकडी मैदानात येते.

आटय़ापाटय़ा क्रीडा कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊन महाराष्ट्रात ३० जिल्हे राज्य संघटनेला संलग्न असून २५ राज्ये व केंद्र शासित प्रदेश आटय़ापाटय़ा फेडरेशन ऑफ इंडियाला संलग्न आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा हा खेळ सुरू झाला असून दक्षिण आशियायी देशांमध्ये हा खेळ आता हात-पाय पसरू लागला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या