आभाळमाया : मूलकणांची गोष्ट

5

आपलं विराट विश्व सूक्ष्म कणांचं बनलेलं आहे. ते कणस्वरूप आपल्याकडेही कणाद नावाच्या ऋषींनी ओळखलं होतं. ‘कण… कण’ हा त्यांचा ध्यास होता. मात्र त्या काळाच्या मर्यादा लक्षात घेता आज विश्वातील मूलकणांची जी संख्या प्राप्त झाली आहे ती सापडणं शक्य नव्हतं, परंतु अशा संकल्पनाच पुढील संशोधनाला चालना देतात. टॉलेमी यांनी विश्वाच्या केंद्रस्थानी आपली पृथ्वी आहे असं मानलं. त्यानंतर कोपर्निकस यांनी सूर्यकेंद्रित पृथ्वीची कल्पना केली. आजच्या आधुनिक खगोल विज्ञानाच्या आकलनानुसार या दोन्ही कल्पना मागे पडल्या आहेत आणि आपली सूर्यमाला आपल्या आकाशगंगा दीर्घिकेतील एक छोटासा भाग आहे हे सिद्ध झालंय. आपला जीवनदाता सूर्य आणि पृथ्वी या विश्वाच्या विराट आकाराच्या तुलनेत नगण्य वाटत असले तरी इथल्या जीवसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत विराटच आहेत.

खरं तर या विश्वातील प्रत्येक सूक्ष्म कण महत्त्वाचा आहे. कणाकणांच्या समुच्चयातूनच हे विश्व बनलं आहे. विसाव्या शतकात यातील 116 मूलकणांचा शोध लागला. कण प्रक्रियांचा अंदाज आला. अधिक सूक्ष्म कणांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू झाला. आइन्स्टाईन यांच्या काळातील एस. एन. बोस आणि प्रा. हिग्ज यांनी अतिसूक्ष्म म्हणजे ज्याचं पुढे विभाजन अशक्य आहे अशा मूलकणाचं स्वरूप जाणून घेण्याचं सूत्र मांडलं.

कणविभाजनातून ‘अणुशक्ती’ कशी निर्माण होते आणि तिचा विनाशी तसंच विधायक वापर कसा करता येतो याचा अनुभव जगाने गेल्या पाऊण शतकात घेतला आहे. ‘हिग्ज-बोसॉन’ या मूलकणाचा प्रत्यय येण्यासाठी ‘सर्न’ नावाचा एक लार्ज हॅड्रन कोलायडर फ्रान्स आणि स्वित्झर्लंडच्या सीमेवर, जमिनीखाली 100 मीटरवर 20 किलोमीटर परीघ असलेला एक बोगदा निर्माण करून त्यातून या समीकरणातील मूलकणाचा शोध नुकताच घेतला गेला. त्याला ‘गॉड पार्टिकल्स’ म्हटलं गेलं.
आता नव्या संशोधनाने हाय एनर्जी न्यूट्रिनोसारख्या विश्वातील प्रत्येक गोष्टीच्या (अगदी आपल्याही) आरपार जाणाऱया मूलकणांचा रहस्यभेद संशोधकांनी केला आहे. त्याला ते गॉड नव्हे, ‘घोस्ट’ पार्टिकल म्हणतात. हे न्यूट्रिनो पकडण्यासाठी फार मोठे डिटेक्टर बनवावे लागतात.

काही काळापूर्वी अंटार्क्टिकावरील प्रचंड हिमनगांखाली नैसर्गिकरीत्या अडकलेल्या न्यूट्रिनोंचा शोध घेतला गेला तेव्हा त्यांचा उगम किंवा सोर्स सापडला. गरगरणारे कृष्णविवर केंद्रस्थानी असलेल्या एका सर्पिलाकृती दीर्घिकेचा हा प्रताप आहे. या ‘ब्लेझर’ दीर्घिकेचं स्थान विश्वात आपल्यापासून 3.7 अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर आहे. म्हणजे तिथून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत यायला 3 अब्ज 70 कोटी वर्षे लागतात. इतक्या दुरून हे न्यूट्रिनो आले होते. ही सर्पिलाकृती दीर्घिका मृग तारकासमूहात आहे.

दक्षिण ध्रुवावर अमेरिकेची ‘आइस क्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी’ आहे. तिथलं हे निरीक्षण. पृथ्वीवरच्या आणि अंतराळातील यंत्रणेकडून त्याला दुजोरा मिळाला आणि ‘घोस्ट’ मूलकणांच्या स्रोताचं रहस्य उलगडलं.

या मूलकणांचा अभ्यास खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. 1916 मध्ये आइन्स्टाईन यांनी भाकीत केलेल्या आणि बरोबर 100 वर्षांनी 2016 मध्ये प्रत्यक्ष सापडलेल्या ग्रॅव्हिटेशनल वेव्हज् किंवा गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात याचं महत्त्व आहे.

वैज्ञानिक म्हणतात, ‘‘या न्यूट्रिनोच्या मूलस्रोतांच्या संशोधनाने आपल्या विराट विश्वाकडे पाहण्याची एक नवी खिडकी उघडली आहे.’’ आइस क्युब वेधशाळेच्या डेरेन ग्रॅण्ट यांनी म्हटलंय की, ‘‘न्यूट्रिनो हे निसर्गाचे विविधलक्ष्यी खगोलीय संदेशवाहक आहेत. ते त्यांच्या निर्मितीची जागा सहज सोडतात आणि विश्वात पसरून त्यांच्या स्रोताचा मार्ग दाखवून देतात.’’

1912 पासून या वैश्विक मूलकणांचं गूढ संशोधकांना आव्हान देत होतं. विश्वातील कोणत्या तरी भयंकर उत्पातातून ते निर्माण होत असावेत असं सुरुवातीला वाटलं होतं. कालांतराने ‘कणविज्ञाना’त जसजशी प्रगती होत गेली आणि विविध मूलकणांचा शोध लागण्यास सुरुवात झाली तेव्हा ‘गॉड’ आणि ‘घोस्ट’ पार्टिकलचं गूढही आवाक्यात आल्यासारखं वाटू लागलं आणि त्याचा ठावठिकाणाही समजला.

शतकभरात विश्वाचं स्वरूप बऱयापैकी जाणून घेणं ही मानवी बुद्धीची कमाल आहे. अफाट विश्वात वसलेल्या अनेक गोष्टी आणि त्यांचे शोध अजूनही लागायचे आहेत. त्यासाठी पृथ्वीवरच्या मानवी जगात संशोधनाला पोषक अशी समृद्धी आणि शांतता नांदायला हवी. तरच नवं संशोधन स्वस्थ चित्ताने होऊ शकतं.
बदलतं हवामान, वाढतं तापमान, अस्त्र्ासंहाराचा धोका आणि आपल्या सुंदर ग्रहावर माणसानेच मांडलेला हाहाकार या गोष्टी एका बाजूला आणि त्यापैकीच काही माणसांच्या मेंदूतून निर्माण झालेल्या संशोधक वृत्तीने वैश्विक कोडी उलगडण्याचा चंग ही एकाच माणसाची दोन रूपं. पृथ्वीवर आपण आहोत आणि वैज्ञानिक प्रगतीच्या काळात आहोत ही भाग्याची गोष्ट आहे हे कळेल तेव्हा आपली वैज्ञानिक दृष्टी वाढीला लागेल आणि ‘जय विज्ञान’ला अर्थ प्राप्त होईल.