आम्ही खवय्ये : मी चोखंदळ

16

कविता लाड ज्याप्रमाणे कामाच्या बाबतीत निवडक तशीच खाण्याबाबतही विशेष चोखंदळ आहे.

– ‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय? – खाणं म्हणजे आवडलं पाहिजे, रुचलं पाहिजे. पौष्टिक पाहिजे. उगाचच समोर आलं म्हणून खायचं नाही. माझं तर असं आहे की, खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. त्यामुळे समोर येईल ते खात नाही. जे आवडेल तेच खाते.

– खायला काय आवडतं? – सर्व मांसाहारी पदार्थ, गोड पदार्थ. यामध्ये चॉकलेट, गुळाचे सगळे पदार्थ आवडतात. चटपटीतही आवडतं आणि कधी कधी साधंही खावंसं वाटतं. खूप प्रवास किंवा धावपळ झाली असेल तर साधा वरण-भातही आवडतो.

– खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?- खाण्याच्या बाबतीत मी चोखंदळ आहे. त्यामुळे वाटेल ते खात नाही. व्यवस्थित खाते. समोर आलंय म्हणून काही खात नाही. जे खाते ते कमी प्रमाणात खाते. कमी खाल्लं तर ते कधीच बाधत नाही.

– डाएट करता का? – नाही. शिस्त लावून घेतलीय. सकाळी उठल्यानंतर ड्राय फ्रूट, रात्री उशिरा किवा प्रयोगानंतर मी खात नाही. तेव्हा प्रथिनेयुक्त आहार घेते. माझी अशी एक ठराविक
जीवनशैली ठरलेली आहे. त्याला मी डाएट म्हणणार नाही. ती माझी एक हेल्दी लाईफस्टाईल आहे असं मी म्हणेन.

– आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता? – खूपच वेळा. खूप बाहेर खाणं होत असतं. हॉटेलिंग आठवडय़ातून एकदा होतं.
– कोणत्या हॉटेलमध्ये जायला आवडतं? – असं काही ठराविक हॉटेल नाहीए, पण इटालियन किंवा चायनीज हे जास्त आवडतं.

पेय कोणतं आवडतं? – मी कोणत्याही प्रकारची पेयं पित नाही.

– प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता? – मला जे लागतं ते स्वतःसोबत घेते. तूप, मध, भाकरीचं पीठ. कारण भाकरी नाही मिळाली तर तिथून भाकरी करून देतात. प्रवासात फळही घेते. चिक्की.

दौऱयादरम्यान आवडलेला खास पदार्थ? – कोल्हापुरात असले की, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, चिकन, मटण खाल्लंच पाहिजे, सांगलीला गेल्यानंतर भेळ, पुण्याला गेल्यावर तिथे फिश करी राईसवाला आहे तिथे फिश खाणं होतं.

स्ट्रीट फूड आवडतं का? – चाट आवडतं, शेवपुरी, पाणीपुरी.

घरच्या स्वयंपाकात काय आवडतं? – फिश करी राईस.

– पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा?
– आमच्या घरी मासे, वालाचे कालवणं खुप आवडतं सीकेपी स्टाईल कालवणं आवडतात. करून खाऊ घालते.

उपवास करता का ? – नाही.

कोलंबीचे कालवण
कोलंबी स्वच्छ धुऊन ठेवायची. फोडणी देताना लसूण ठेचलेला, सीकेपी मसाला, कोकम आगळ, मीठ घालायचं. कोलंबीला लावायचं. त्याला पाणी सुटलं की, त्यात नारळाचा रस घालायचा. कोलंबी कालवण तयार. आवडीनुसार बारीक चिरलेला कांदा घालू शकता.