आयुष्याच्या प्रवासातली ‘शिदोरी’

>> अस्मिता येंडे

शिदोरी’…. कदाचित आजच्या पिढीला या शब्दाचा अर्थही माहीत नसेल. शिदोरी म्हणजे काय तर लहान असताना आपण सहलीला जायचो तेव्हा आई स्वतःच्या हाताने बनवलेले अन्न एका गाठोडय़ात बांधून देत असे. ते प्रेमरूपी गाठोडं म्हणजेच ‘शिदोरी’…त्यात असते माया, प्रेम, आत्मीयता.

‘शारदा प्रकाशन’ने काव्यरसिकांसाठी अशीच एक प्रेमाने भरलेली भेट आणली आहे. ती भेट म्हणजे कवी प्रसाद कुळकर्णीलिखित ‘शिदोरी’ हा काव्यसंग्रह. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा काव्यसंग्रह म्हणजे अनुभव, ज्ञान, संस्कार, संवेदनशीलता, जाणीव यांचं सुरेख मिश्रण आहे. कविता आणि कवी यांचं नातं सच्चा मित्रासारखं. एकांतात साथ देते ती कविता. मनातलं कागदावर उमटवते ती कविता.

या काव्यसंग्रहातील कविता वैविध्यपूर्ण आहेत. ‘ती माझी कविता’, ‘माझं काव्य’, ‘प्रेम माझे जे कवितेवर’ या कवितांमधून कवीचे काव्यावरील (कविता)असलेले प्रेम दिसून येते. आजकाल सगळीकडे माजलाय तो स्वैराचार…‘स्वैराचार’ या कवितेतून समाजाचे विदारक वर्णन केले आहे. नात्यांपेक्षा पैसा मोठा झाला. गरिबी वाढतेय. मदतीचे हात पुढे येतच नाहीत. दुःखी अजून दुःखी आहे. स्वार्थी वृत्ती वाढतेय. ‘जात’ मनातून काही जात नाही. स्त्रीवर अत्याचार होतो आहे. स्त्रीचा जन्म नाकारला जातोय. या कवितेतून कवी प्रसाद कुळकर्णी यांनी वास्तवतेचे वर्णन केले आहे.

आयुष्यात कितीही संकटे आली तरी खचून न जाता त्या संकटांवर मात करता आली पाहिजे. प्रत्येक क्षण सुखासमाधानाने जगता आला पाहिजे. जे आहे त्यात सुख मानले पाहिजे हा संदेश कवी प्रसाद यांनी ‘आयुष्य जगताना’ या कवितेतून दिला आहे. यावरून कवी प्रसाद किती सकारात्मकतेने आयुष्याकडे पाहत आहे याचा प्रत्यय येतो.

संस्कारांची शिदोरी देणारे आईबाबा यावरही सुंदर कविता लिहिली आहे. ‘बाबा’ या कवितेतून वडिलांबद्दलचे प्रेम, आपुलकी दिसून येते. बाबा हा बाबा असतो. स्वतःची हौस कमी करतो पण मुलांना काही कमी पडू देत नाही. वेळप्रसंगी रागावतो, मारतोसुद्धा पण कौतुकाने पाठही थोपटतो. ‘बाबा’ या कवितेत कवी प्रसाद यांनी म्हटले आहे की, ‘ज्याने दिला हात आधाराचा पहिल्यांदा, त्याला आधारासाठी जेव्हा माझा हात देतो तेव्हा खूप त्रास होतो.’
एखाद्या बागेत एक मुलगा-मुलगी बसलेले असतील तर येणारी-जाणारी उगाचच त्यांच्यातील नातं शोधत राहतात. त्यांच्यातील नात्याला वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात. त्यांच्या चारित्र्यावर संशय घेतात. या वृत्तीच्या लोकांचे विचार ‘बागेतील दोघे’ या कवितेतून मांडले आहेत. कवी प्रसाद म्हणतात की, ‘ना नाते रक्ताचे असती बंध विश्वासाचे, निरपेक्ष भावनांचे अन् धागे जिव्हाळ्याचे, ती दोघे एकमेकांशी सुख- दुःखे वाटत होती, बागेच्या कोपऱयाशी ती दोघे बसली होती.’

आपण पहाटे रोज देवाची पूजा करतो. त्याला हार, नारळ अर्पण करतो. दिवा लावतो. नवस करतो. तू माझी ही इच्छा पूर्ण कर, मी तुला नारळ- पेढे देईन. ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्याला आपण काय देणार? भक्ती मनापासून केली पाहिजे. माणसात देव पाहण्याऐवजी आपण दगडात देव शोधतो. भुकेलेल्याला आपण अन्न देत नाही पण देवाला पक्वान्नांचे ताट वाढतो. ‘देव पावला’ या कवितेतून कवी प्रसाद यांनी देवाचे मनोगत लिहिले आहे. देवाला काय वाटत असेल याची कल्पना कवीने कवितेतून मांडली आहे.

‘शिदोरी’ हा काव्यसंग्रह म्हणजे अनुभवजन्य काव्यनिर्मिती आहे. कवी प्रसाद कुळकर्णी यांनी ही अनुभवांची शिदोरी वाचकांना दिली त्याबद्दल मनःपूर्वक आभाक! पुस्तक हातात घेतल्यावर पुस्तकाचे मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. ‘शिदोरी’ काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ साकारले आहे चित्रकार सतीश खोत यांनी. मलपृष्ठासाठी कवी अशोक बागवे यांनी सुंदर विवेचन केले आहे. कवयित्री आशा दोंदे यांनी शब्दाशीर्वाद दिले आहेत. आपल्या आयुष्याच्या प्रवासातली ‘शिदोरी’ कवी प्रसाद कुळकर्णी यांनी काव्यरसिकांना चाखावयास दिली त्याबद्दल धन्यवाद! रसिकांना ही शिदोरी नक्कीच सोबती ठेवावीशी वाटेल.

शिदोरी (काव्यसंग्रह)
कवी – प्रसाद कुळकर्णी (साद)
प्रकाशन – शारदा प्रकाशन, ठाणे
मूल्य – ११३ रुपये