इसिसने घडवला बर्लिनमधला दहशतवादी हल्ला

जर्मनीच्या चान्सेलर अॅन्जेला मर्केल यांनी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली

सामना ऑनलाईन। बर्लिन

जर्मनीची राजधानी बर्लिन इथे एका ट्रकने गजबजलेल्या बाजारामध्ये अनेकांना चिरडलं होतं,ज्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता. ही दुर्घटना नव्हती तर तो दहशतवादी हल्लाच होता हे स्पष्ट झालंय. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आयसिसच्या अमाक या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त प्रसारीत करण्यात आलं आहे.

जर्मनीतील नागरिकांनी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहीली
जर्मनीतील नागरिकांनी या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली

जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन शहरात एका गजबजलेल्या ख्रिसमस बाजारामध्ये भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने अनेक जणांना उडवलं होतं. यामध्ये १२ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जर्मनीचे गृहमंत्र्यांनी तेव्हाच अंदाज वर्तवला होता की हा अपघात नसून दहशतवादी हल्ला असावा.ज्या ख्रिसमस बाजारामध्ये ही घटना घडली तो बाजार ब्राइशाइप्लात्ज़ इथला असून कैसर विल्हेम मेमोरियल चर्चजवळ आहे.

या घटनेशी निगडीत प्रत्येक गोष्टींचा पोलिसांनी तपास करायला सुरूवात केली आहे. या हल्ल्यासाठी वापरण्यात आलेला ट्रक हा पोलंडमधून चोरी करण्यात आला होता. प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटकही केली आहे. ही व्यक्ती अफगाणिस्तान किंवा पाकिस्तानचा मूळ रहिवासी आहे आणि तो फेब्रुवारी महिन्यात जर्मनीमध्ये आला होता आणि शरणार्थी म्हणून आपल्याला इथे राहू दिलं जावं असं निवेदन त्याने सरकारी यंत्रणांकडे केलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. हीच व्यक्ती ट्रक चालवत होती असं पोलिसांना वाटतंय.

berlin-3
जर्मनीतील या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समधील सुरक्षाव्यवस्था आणखी कडक करण्यता आली आहे.

बर्लिनर मॉर्गनपोस्टच्या पत्रकाराने या घटनेचं वर्णन करताना सांगितलं की घटनास्थळाचं दृश्य अत्यंत भीषण आणि घाबरवून टाकणारं होतं. या घटनेनंतर फ्रान्समधील ख्रिसमस बाजारांमधील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. कारण १४ जुलै २०१६ ला अगदी अशाच प्रकारचा एक दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. भरधाव ट्रकने नीस शहरात ७० जणांना चिरडून मारलं होतं.