कोकण किनारपट्टीवर वादळी वारे; समुद्राला उधाण

4

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी/सिंधुदुर्ग

गेले चार दिवस कोकणात पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी समाधानी झाला असून शेतीची कामे उरकण्यावर त्याने जोर दिला आहे. पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार असे वेधशाळेने जरी जाहीर केले असले तरी आज सकाळपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर वादळी वाऱ्याने जोर पकडल्याने समुद्राला प्रचंड उधाण आले असून त्यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, सायंकाळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयावर पडलेल्या विजेच्या पोलमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या घटनेतून अनेक जण बचावले असून खबरदारी म्हणून अनिश्चित काळासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

मालवण किनारपट्टीवर वादळी वारा व पावसाचा जोर सकाळपासून होता. शहरातील मेढा तालुकास्कूलच्या समोरील रस्त्यावर झाड कोसळून तीन वीज खांब जमीनदोस्त झाले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अमेय वांदरकर यांच्या कारवर दोन वीज खांब पडल्याने सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. सातेरी मंदिर देऊळवाडा भागातही वीज वाहिन्यांवर माड कोसळला. बुधवारी सकाळी सोसाटयाच्या वारा-पावसात मच्छीमार्केट परिसरात मत्स्य विक्रेत्यांची एकच धांदल उडाली. वाऱ्यामुळे समुद्री लाटांचा जोर वाढल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे. दिवसभर मालवणात वारा आणि पावसाचा खेळ सुरू होता. त्यात वीज वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत. ग्रामीण भागात काही गावे वाडीत वीजपुरवठा दोन ते तीन दिवस खंडित आहे. मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागामध्ये पावसामुळे घर आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे. आंबा घाटामध्ये झाड पडल्यामुळे रत्नागिरी ते कोल्हापूर वाहतूक काही काळ ठप्प होती.

20170628_091418-malvan

मंडणगड तालुक्यात नरेश यादव यांच्या घरावर झाड पडले. तर परेश गुजराथी यांच्याही घराचे नुकसान झाले आहे. नवानगर कोथाकोड येथे संतोष धनवाडे यांच्या गोठ्याचे नुकसान झाले, मौजे जिमवाडी येथील रस्त्यावर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. चिपळूण तालुक्यात टेरव येथे निर्मला जाधव यांच्या घराचे नुकसान झाले. गुहागर तालुक्यात शुगांरतळी येथे तुळशीदास टाक यांच्या घरात पाणी शिरल्याने इलेक्ट्रिक वस्तूंचे नुकसान झाले. संजय कदम यांच्याही घरात पाणी शिरले.

यांचे झाले नुकसान
मालवण तालुक्यात वीणा पराडकर व विलास देऊलकर यांच्या घरावर विजेचा खांब कोसळून घराचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. भरड येथे वडाचे झाड कोसळले. शहरातील भरड भागात विनायक तायशेट्ये यांच्या घरावर झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तर हडी येथील गणेश नरे यांच्या घरावर झाड कोसळून सुमारे १५ हजाराचे नुकसान झाले आहे.

20170628_121008-malvan

देवबाग महापुरुष मंदिर येथेही एका घरावर झाड कोसळले. आचरा येथील तारामती हरिश्चंद्र सुर्वे यांच्या घरावर फळसाचे झाड कोसळून १० हजार रुपयाचे नुकसान झाले. वायंगणी येथील रेश्मा रमेश त्रिंबककर यांच्या घर आणि किराणा दुकांना वरील सिमेंटचे पत्रें वाऱ्याने उडाले. यात सुमारे २१०० रुपयाचे नुकसान झाले आहे.

गेल्या २४ तासांतील पाऊस
रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासामध्ये ५१३.७० मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड ४७ मिमी, दापोली ४७.६० मिमी, खेड ८०.३० मिमी, गुहागर ५२ मिमी, चिपळूण ८३.७० मिमी, संगमेश्वर ३७.६० मिमी, रत्नागिरी ३७.७० मिमी, लांजा ५३ मिमी, राजापूरमध्ये ७४.८० इतका पाऊस पडला.

सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ५५.९२ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात तालुकानिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे आहे. यात दोडामार्ग – ४७, सावंतवाडी – ६६, वेंगुर्ला – २७.४, कुडाळ – २८, मालवण – १६, कणकवली – ६५, देवगड – ११०, वैभववाडी – ८८ मि.मी पाऊस झाला.

सातेरी मंदिर देऊळवाडा भागातही वीज वाहिन्यांवर माड कोसळला. यात पराडकर, देऊलकर यांच्या घराचे नुकसान झाले.