खाडी परिसरातील झुडपात अल्पवयीन मुलाचा मृतदेह; वडाळ्यात खळबळ

सामना प्रतिनिधी । मुंबई

सकाळी अंगणात खेळणारा पाच वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता होऊन त्याचा दुपारच्या वेळेस खाडी परिसरातील झुडपात मृतदेह सापडल्याने वडाळ्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. तौसिफ नौशाद शेख असे या मुलाचे नाव असून वडाळा टी. टी. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तौसिफचा मृतदेह झुडपात सापडल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात असून पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत.

वडाळा येथील शांतीनगरात असलेल्या मदिना मस्जिदशेजारी तौसिफ नौशाद शेख हा त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. आज सकाळी नऊच्या सुमारास तौसिफ अंगणात खेळत होता. मात्र अचानक तो तेथून बेपत्ता झाला. घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही. दरम्यान, वडाळ्यातील खाडी परिसरात असलेल्या झुडपात तौसिफ बेशुद्वावस्थेत एका स्थानिकाच्या नजरेस पडला. त्याने लगेच पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली. त्यानंतर वडाळा टी. टी. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तौसिफला शीव रुग्णालयात नेले. मात्र त्याला दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. तौसिफच्या अशा संशयास्पद मृत्यूमुळे वडाळा परिसरात घबराट पसरली आहे.

तौसिफ तेथे गेलाच कसा की त्याला कोणी तेथे नेले, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवालानंतर तौसिफचा मृत्यू कसा झाला ते स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.