नीरा नदीत अवैध मातीउपसा

प्रातिनिधिक फोटो

 

 दोन मशीन ताब्यात

सुपे – बारामती आणि फलटण तालुक्यासाठी वरदाई ठरलेल्या नीरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात मातीउपसा करण्यात येत आहे. याकडे दोन्ही तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. नागरिकांनी वारंवार आवाज उठवल्यावर बारामती व फलटण तालुक्यातील तहसीलदारांनी एकत्र येऊन रविवारी पहाटे बारामती तालुक्यातील कोर्‍हाळे खुर्द येथील नीरा नदीपात्रात चाललेला अवैधरीत्या मातीउपशावर कारवाई केली. यामध्ये वडगाव निंबाळकर पोलिसांनी दोन पोकलॅण्ड मशीन ताब्यात घेतल्या आहेत.

येथील नदीपात्रातील बेटावरून मोठ्या प्रमाणात मातीउपसा करण्यात येत होता. या मातीउपशामुळे निसर्गाचाही र्‍हास होत होता तसेच नदीकाठच्या रस्त्यांचीही वाट लागली होती. याबाबत परिसरातील अनेक नागरिकांनी महसूलच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्या होत्या. अधिकार्‍यांनी याबाबतची खातरजमा करत बारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील, नायब तहसीलदार एम. ए. भोसले, मंडल अधिकारी महेश गायकवाड, तलाठी अंकुश भगत, आशीष कदम यांच्यासोबत वडगाव निंबाळकर पोलीस आणि सातारा जिल्ह्यातील फलटण येथील तहसीलदार विजय पाटील, मंडल अधिकारी बी. पी. ढवळे यांच्यासोबत साखरवाडी पोलिसांच्या पथकाने पहाटे साडेचारच्या दरम्यान नदीपात्रात कारवाई केली. अधिकारी येत असल्याची माहिती मिळताच मातीमाफियांनी आपली वाहने पळवून नेली. मात्र, अवजड पोकलॅण्ड मशीन माफियांना नेता आले नाही. यामुळे ती तेथेच सोडून त्यांनी पळ काढला.

अधिकार्‍यांनी मशीन ताब्यात घेऊन खोदकाम केलेल्या जागेचे मोजमाप केले. नदीच्या दोन्ही बाजूंकडून सुमारे पाचशे ब्रास माती काढल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. पथकाने पळून गेलेल्या वाहनांचे क्रमांक घेतले असून, ते बारामती आरटीओ कार्यालयाला कळवले जाणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी सांगितले. हद्दीचा वाद असल्याने बारामती भागाकडून महसूल अधिकारी कारवाईसाठी गेले तर हद्दीचे कारण सांगून माफिया अधिकार्‍यांनाच धमकावत होते.