पनवेल परिसरातल्या फार्महाऊसमध्ये डीजे,लाऊडस्पीकरला मनाई

सामना ऑनलाईन, पनवेल

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पनवेल परिसरात असलेल्या फार्महाऊस, रिसॉर्ट, हॉटेल्स या ठिकाणी मोठमोठय़ा पाटर्य़ांचे आयोजन करण्यात येते व मोठमोठय़ा आवाजात वाद्ये वाजविली जातात. परंतु हा परिसर इकोझोन अंतर्गत असल्याने कोणत्याही परिस्थितीत अशी वाद्ये वाजविण्यास परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट मत परिमंडळ-२चे सहाय्यक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी व्यक्त केले आहे.

याबाबत आजमितीस कोणत्याही रिसॉर्ट, फार्महाऊस वाल्याने परवानगीसाठी अर्ज केलेला नाही आहे. तसेच कोणालाही डी.जे,लाऊडस्पीकर परवानगी देण्यात येणार नाही याबाबतच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच यासंदर्भात सर्व हॉटेल मालकांची बैठक घेऊन ते देत असलेल्या अन्नातून विषबाधा होऊ नये यासंदर्भात घ्यायची काळजी, मद्यपान, महिलांची छेडछाड, वाढती गर्दी आदींबाबत आवश्यक त्या सूचना त्यांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नववर्षाच्या स्वागताला अनुचित प्रकाराचे गालबोट लागू नये यासाठी स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात येणार आहेत. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांविरोधातही मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत