पर्यटक करणार रापण… आणि आंबे खाण्याची स्पर्धा

सामना ऑनलाईन, रत्नागिरी

पारंपारिक मासेमारी अनुभवताना पर्यटकही करणार रापण… जास्तीत जास्त आंबे खाण्याची पर्यटकांसाठी मजेशीर स्पर्धा त्याचबरोबर बीच व्हॉलीबॉल, घोडागाडी रपेट आणि कोकणी पदार्थांची मेजवानी २८ ते १ मे दरम्यान मांडवी पर्यटन महोत्सवात पर्यटकांना अनुभवायला मिळणार आहे.

मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर यांनी आज पत्रकार परिषदेत ४ दिवस मांडवी समुद्रकिनारी होणाऱ्या पर्यटन महोत्सवातील विविध कार्यक्रमांची माहिती जाहीर केली. कीर यावेळी म्हणाले की, श्रीदेव भैरव नामसप्ताह सोहळय़ाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने आम्ही मांडवीमध्ये पर्यटन महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवामध्ये दि.२८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी रत्नागिरीचे सुपूत्र, मारुतीराव कीर यांचे शिष्य आणि सोनू निगम यांचे सहाय्यक विजय शिवलकर यांचा बहारदार संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मांडवी पर्यटन महोत्सवाच्या शिर्षकगीताचेही अनावरण होणार आहे. दि.२९ एप्रिल रोजी संजीव साळवी प्रस्तृत पॅरीसन फॅशन शो आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन फेम विनय चेऊलकर यांचा स्वरगंध कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दि.30 एप्रिल रोजी स्थानिक लोककलांचा आविष्कार सादर होणार आहे. त्यामध्ये ढोलपथक, जाखडी, नमन, संकासूर, शास्त्रीय नृत्य या विविध कलाप्रकारांचा समावेश आहे. दि.१ मे रोजी उदय साटम प्रस्तृत मराठी पाऊल पडते पुढे हा मराठमोळा संगीतमय कार्यक्रम सादर होणार आहे. या पर्यटन महोत्सवात होडीतून पर्यटकांना पारंपारिक मासेमारी कशी करतात याची माहिती दिली जाणार आहे. तसेच पर्यटकांना रापण पध्दतीने मासेही पकडता येतील. आंबे खाण्याची स्पर्धा, बीच व्हॉलीबॉल, घोडागाडी रपेट असे विविध उपक्रमही यावेळी राबवले जाणार आहेत. कोकणी मेवा आणि खाद्योत्सवही या महोत्सवात साजरा होणार असल्याची माहिती राजीव कीर यांनी दिली. यावेळी श्रीदेव भैरव देवस्थान मांडवीचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर, नगरसेवक संतोष कीर, दया चवंडे, नितीन तळेकर व इतर उपस्थित होते.