पिठलं पोळी… साबुदाणा खिचडी

लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांची शाकाहारी… सोपी खाद्यभ्रमंती.

‘खाणं’ या शब्दाची तुमच्या दृष्टीने व्याख्या काय?
– खाण्याच्या बाबतीत मी ‘चूझी’ नाही. त्यामुळे खाणं म्हणजे ज्या वेळेस इच्छा होईल तेव्हा मिळेल ते खाऊन त्यातून जो आनंद मिळतो ते म्हणजे ‘खाणं’.

खायला काय आवडतं?
– संपूर्णतः शाकाहारी आहे. साबुदाण्याची खिचडी, भरीत-पिठलं आणि पोळी हे माझे फेव्हरेट पदार्थ आहेत. हे पदार्थ कधीही उपलब्ध होऊ शकतात. शिवाय उघडय़ा माळरानावर किंवा एसटीमध्ये खा. केव्हाही चविष्टच लागतात.

खाण्याच्या आवडीतून फिटनेसची काळजी कशी घेता?
– माझ्या फिटनेस खाण्याबद्दलची काळजी पत्नी जास्त घेते, कारण आवश्यक ते पदार्थ ताटात वाढते. त्यामुळे फिटनेस राखला जातो. मनसोक्त खायचं आणि जिमिंगच्या वेळी फिटनेसची काळजी घ्यायची या मताचा मी आहे.

डाएट करता का? – नाही.

आठवडय़ातून किती वेळा बाहेर खाता?
– नाटकांचे दौरे वाढल्यामुळे बाहेरचं खाणं वाढलंय, त्यामुळे आठवडय़ातून दोनदा तरी बाहेर खाणं होतं. नाहीतर एरवी महिन्यातून एकदा व्हायचं.

कोणत्या हॉटेलमध्ये जाता?
– शक्यतो ढाब्यावरील पदार्थ आवडतात. नाशिक-मुंबई प्रवासादरम्यान असलेल्या एका ढाब्यावर नेहमी आवर्जून खाणं होतं.

कोणतं पेय आवडतं?
– कोकम सरबत आवडतं.

प्रयोगानिमित्त बाहेर असता तेव्हा खाणं-पिणं कसं सांभाळता?
– शक्यतो चमचमीत किंवा मसालेदार, पनीरचे पदार्थ टाळतो. पचायला हलक्या असलेल्या पदार्थांना प्राधान्य देतो. मैदाचे पदार्थही खात नाही.

स्ट्रीट फुड आवडतं का?
– हो, पॅटीस आणि मोमोज आवडतात.

घरातल्या स्वयंपाकात काय खायला आवडतं?
– माझ्या आईने केलेलं शेंगदाण्याचं कालवणं, पत्नीच्या हातचा पास्ता मला खूप आवडतो. तसेच माझी वहिनी समोसे खूप छान करते. घरी केलेल्या समोशांची चव बाहेरच्या पदार्थांपेक्षाही चविष्ट असल्यामुळे मी हे पदार्थ बाहेर खात नाही.

जेव्हा पाहुण्यांना घरी बोलवता तेव्हा आवर्जून काय खायला घालता?
– नाशिकला दुधा जिलेबी खूप प्रसिद्ध आहे. द्राक्ष आणि नाशिकचा चिवडा, मिसळ हे पदार्थ मी बाहेरून आलेल्या पाहुण्यांना आवर्जून खाऊ घालतो.

उपवास करता का?
– आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र असे वर्षातून दोन उपवास करतो.

स्वतः बनवू शकता अशी डिश आणि त्याची रेसिपी ? –
– मी एकदा मित्रांसाठी पोहे बनवले होते, पण माझा तो प्रयत्न पारच फसला. त्यामुळे ते पोहे मलाच खावे लागले. मी फक्त चहा-मॅगीच बनवतो.