फडणवीसांच्या काळात ६५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पारदर्शकतेची शपथ घेताना गिरीश बापटांची जीभ घसरली

पिंपरी चिंचवड – पारदर्शकतेच्या मुद्यावर तोंडघशी पडलेल्या भाजपाच्या मंत्र्यांचीही अवस्था काहीशी तशीच झाली आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट हे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा उमेदवारांना पारदर्शकतेची शपथ देत असतानाच त्यांची जीभ घसरली. त्यांनी फडणवीस सरकारवरच टीका केली. फडणवीसांच्या काळात ६५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असे पटपट बोलण्याच्या नादात बापट बोलून गेले.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवार शपथ घेण्यासाठी भगवे फेटे बांधून आले होते. गिरीष बापट त्यांना शपथ देत असताना ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच घसरले. फडणवीसांच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि हजारो जनावरे दगावली असे ते बोलतच सुटले. काही वेळाने चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव करत सरकारचे गोडवे गायला सुरुवात केली. भाजपा सरकारच्या काळात शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू झाला असून इंद्रायणीपासून मुळा-मुठेपर्यंत विकासाचे वारे वाहत आहेत असे सांगत बापट यांनी स्वत:ला सावरले. उपस्थित उमेदवारांना मात्र बापट यांची चूक लगेच लक्षात आल्याने त्यांनी त्यांच्या नकळत माना खाली घालणे पत्करले.