फेरीवाला कारवाईमुळे अंध फेरीवाल्यांवर उपासमारीची वेळ, ८०० कुटुंबे हलाखीत

मनोज मोघे । मुंबई

एल्फिन्स्टन रोड दुर्घटनेनंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाले हटविण्यात आले पण या कारवाईमुळे ज्यांचा संपूर्ण उदरनिर्वाहच या धंद्यावर अवलंबून आहे अशा मुंबईतील ८०० अंध व्यक्तींच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. आमच्यासारख्या अंधाची आणखी किती परीक्षा घेणार! भीक मागत नाही, धंदा करतो; पण तोही आधार गेल्याने आम्ही आता करायचे तरी काय, असा सवाल या अंध फेरीवाल्यांकडून केला जात आहे.

मुंबईत ७००-८०० अंध फेरीवाले आहेत. यातील अनेक फेरीवाल्यांना ‘नॅब’कडून भांडवल उभे करण्यासही मदत करण्यात आली होती. महाराष्ट्रभरात यांची संख्या तीन हजारांपर्यंत असल्याचे ‘नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडस्’च्या कार्यकारी संचालक पल्लवी कदम यांनी सांगितले. अंध फेरीकाल्यांना किशेष ओळखपत्र देण्यात याके. सरकारने या समस्येतून तातडीने मार्ग काढाका अशी मागणी त्यांनी केली आहे.

– अनेक फेरीवाले ग्रॅज्युएट-पोस्टग्रॅज्युएट आहेत. या अंध फेरीवाल्यांची ६५० कुटुंबे वांगणी, मालाड-मालवणी येथे राहतात. आता हा धंदाच गेल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून सरकारने त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा असे ‘नॅब’चे ऑनररी सेक्रेटरी जनरल सत्यकुमार सिंग यांनी सांगितले. त्यांना दोन हजारांपासून पाच हजार रुपयांपर्यंत तरतुदीनुसार बेरोजगार भत्ता द्यावा अशी मागणी सिंग यांनी केली.

बोरिवली स्थानकाबाहेर मी गेली १२ वर्षे व्यवसाय करीत आहे. पूर्वी इंदू मिलमध्ये काम करीत होतो. मिल बंद झाल्यानंतर कुटुंबासाठी हा व्यवसाय सुरू केला. मालाडमधील घरी मुलगा आजारी आहे आणि माझ्यावरच घरची जबाबदारी आहे. आम्ही अंध आहोत. भीक मागत नाही, स्वतःचा धंदा करतो. आता तोही गेला तर जगायचे कसे?
– केशव सवाई,अंध फेरीवाला

अंध व्यक्ती आपला जीव धोक्यात घालून रेल्वेत व्यवसाय करीत असतात. त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहेच. त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था उभी करायला हवी. मीही अंध असून अंधांचे प्रश्न कायम मांडत असतो. रेल्वे स्थानकांवर बूथ मिळाल्यास त्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न सुटेल आणि त्यांचा उदरनिर्वाहही होईल.
– रमेश सावंत, सक्षम संघटना