यशस्विनी

3

यूपीएससी परीक्षेत यंदा नंदिनी के. आर. ही तरुणी हिंदुस्थानात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. सतत तीन वर्षे यूपीएससी परीक्षेत पहिला क्रमांक मुलीच पटकावत आहेत. अगदी शालान्त परीक्षेपासून ते यूपीएससी परीक्षेत बाजी मारणाऱ्या विद्यार्थिनींच्या यशावर प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांनी आपल्या लेखात प्रकाश टाकला असून ही समाजपरिवर्तनाची नांदी आहे असेही त्यांनी आपल्या लेखात स्पष्ट केले आहे.

गेल्या काही दिवसांत विविध परीक्षांचे निकाल जाहीर झाले आणि या जाहीर झालेल्या सर्व निकालांमध्ये विद्यार्थिनी सर्वप्रथम क्रमांक पटकावताना दिसत आहेत. यूपीएससीची नंदिनी के. आर. ही विद्यार्थिनी हिंदुस्थानात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली तर याच परीक्षेत दिव्यांगांच्या यादीत उल्हासनगरची प्रांजल पाटील ही हिंदुस्थानात दुसरी आली. त्याचप्रमाणे यूपीएससीच्याच परीक्षेत पुण्याची विश्वांजली गायकवाड ही महाराष्ट्रात सर्वप्रथम आली आहे. सीबीएससीच्या दहावीच्या परीक्षेत आयुप्पी पायघन ही महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षेत मुस्कान अब्दुला पठाण ही महाराष्ट्रात सर्वप्रथम तर याच मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत अनन्या माईटी हिने सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला आहे. विद्यार्थिनींच्या यशाची हीच यादी पुढेही वाढवता येण्यासारखी आहे. केवळ विद्यार्थिनी यशाची दखल घेण्यासाठी काही वानगीदाखल नावाचा उल्लेख केला आहे.

विश्वांजली
विश्वांजली

याप्रमाणेच नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रातही अनेक कर्तृत्ववान महिला किंवा मुली आपलं कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहेत. विद्यार्थिनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण असो किंवा त्यांचं गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण होणं असो, या विषयाकडे केवळ कौतुकाने न बघता अभिमानाने आपली मान ताठ होते, मनाला खूप बरं वाटतं. कारण महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या अनेक समाजसुधारकांनी त्या काळी स्त्री शिक्षणाचा पाया रचला होता. मुलींना मुलांप्रमाणे शिक्षण मिळावे, त्या स्वावलंबी व्हाव्यात, त्यांनाही पुरुषांप्रमाणे विविध क्षेत्रांत समान संधी प्राप्त व्हाव्यात यासाठी त्या समाजसुधारकांनी खूप कष्ट झेललेत आणि स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. विविध मंडळांच्या परीक्षा व स्पर्धा परीक्षांमध्ये चमकणाऱ्या विद्यार्थिनी या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी आहेत. या विविध परीक्षांमध्ये मुलं मागे पडत आहेत आणि मुली सरस ठरत आहेत अशा संकुचित विचाराने याकडे बघून चालणार नाही. परीक्षा म्हणजे स्पर्धा नव्हे, तर एक प्रकारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि मेहनत या निकालांवरून स्पष्ट होत असते. आजच्या स्पर्धेच्या वातावरणात देशात आणि महाराष्ट्रात विद्यार्थिनींची दिसून येणारी चुणूक ही अभिमानास्पद आहे.

nandini-k-r

एकीकडे विज्ञान, तंत्रज्ञान, क्षेपणास्त्र, उद्योग, व्यापार, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत भरभरून प्रगती होत असताना दुर्दैवाने आजही समाजात ‘मुलगी वाचवा’ अभियान राबवावे लागते. एकीकडे शिक्षणाच्या सर्व सुविधा उपलब्ध असताना आणि समाज परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभा असताना समाजात काही ठिकाणी आजही स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकार वर्तमानपत्रांतून वाचायला मिळतात. फार मोठ्या प्रमाणात नसेल, पण आजही ‘मुलीचं ओझं नको’ हा विचार समाजात बऱ्यापैकी कानावर पडतो. तशा स्वरूपाच्या बातम्या प्रसारमाध्यमातून पाहायला मिळतात.

प्रांजल पाटील
प्रांजल पाटील

अशा संमिश्र समाजस्थितीत विविध परीक्षांमध्ये विद्यार्थिनींनी संपादन केलेले यश खरं समाजभान जागवणारे आहे असे म्हणावे लागेल. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजसुधारकांनी ज्या उद्दिष्टांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला आणि बऱ्याच सुधारकांनी स्त्री शिक्षणाला आपल्या घरातूनच प्रारंभ केला त्या सगळ्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांना आज १०० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर खऱ्या अर्थाने यश येऊ लागले आहे. कुटुंबातील मुलांनी घवघवीत यश प्राप्त केल्यावर जसा आनंदोत्सव साजरा केला जातो तसाच आनंदोत्सव कुटुंबातील मुलींनी प्रावीण्य प्राप्त केल्यावर साजरा केला जातो ही सकारात्मक बदलाची नांदी आहे. म्हणूनच अलीकडे विविध परीक्षांमध्ये विद्यार्थिनींना मिळणारे यश हे केवळ नापास, श्रेष्ठ-कनिष्ठ अथवा गुणवत्ता यादी यापुरते मर्यादित नसून महिला शिक्षण, महिला स्वावलंबन, महिला सन्मान, महिला सबलीकरण अशा विविध विषयांना न्याय देणारा विषय म्हणून या विद्यार्थिनींच्या यशाकडे बघणे उचित ठरेल.

लेखकाच्या प्रारंभी काही यशस्विनींच्या नावाचा उल्लेख करत असताना दहावीच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मुस्कान अब्दुल पठाण हिनं माझं विशेष लक्ष वेधून घेतलं. मुस्लिम समाजातील महिलांवर या विषयावर अनेक वेळा समाजात चर्चा होत असते. पण मुस्कानचं यश मुस्लिम समाजासाठी खूप बोलकं आहे. महिला शिक्षणाचा आणि विद्यार्थिनींच्या यशाचा उल्लेख असाच चढत्या श्रेणीत राहिल्यास कालांतराने राजकारण आणि नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाच्या कुबडीची आवश्यकता राहणार नाही असा आशावाद ठेवण्यास काय हरकत आहे?

खरं तर आमची शिक्षण व्यवस्था लिंगभेदावर आधारित कधीच नव्हती. पुरातन काळातही आताच्या प्रमाणे महिलांच्या यशाची गुणवत्ता यादी तयार करायची झाल्यास गार्गी, अरुंधती, मैत्रेयीपासून १०० वर्षांपूर्वीच्या आनंदीबाई जोशींपर्यंत अनेक यशस्विनींची नावं त्या गुणवत्ता यादीत लिहिता येतील. मात्र आपल्या देशावर झालेली विविध आक्रमणं, त्यानंतरची ब्रिटिश राजवट आणि उद्ध्वस्त झालेल्या समाजव्यवस्थेमुळे या देशाची यशस्विता काळाच्या पडद्याआड गेली. जातपात, स्पृश्य-अस्पृश्यता, अंधश्रद्धा व लिंगभेदाने पोखरलेल्या समाजाला पुन्हा उभारी देण्याचे काम संतांनी व समाजसुधारकांनी केले. त्यांच्या शतकानुशतकांच्या अथक प्रयत्नानंतर समाजाभिसरण झालं. अबला, वंचित, शोषित आणि चूल व मूल बघणाऱ्या स्त्रीला महिला शिक्षणाच्या चळवळीनं निर्णायक दिशा दिली. आज गुणवत्ता यादीत झळकणाऱ्या विद्यार्थिनी हा त्याचा परिणाम आहे. शतकांच्या संघर्षानंतर स्त्रियांच्या प्रगतीची कवाडं खुली झाली आहेत. म्हणूनच विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत विद्यार्थिनींचं झळकणं हे अभिनंदनीय असून समाजपरिवर्तनाची नांदीच आहे.