राजापूरच्या ब्रिटिशकालीन वखारीला मिळणार नवा साज

12

सामना प्रतिनिधी । मुंबई

रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यातल्या ब्रिटिशकालीन वखारीची पुनर्बांधणी करून या वखारीचे वस्तुसंग्रहालय व आर्ट गॅलरीत रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यामुळे राजापूर तालक्याच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळणार आहे.

रत्नागिरी जिह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले असून या वखारीचे संवर्धन व जतन करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी वायकर यांनी या पत्रात केली आहे.

राजपूरमध्ये येणारे पर्यटक या वखारीला आवर्जून भेट देतात, पण सध्याची अवस्था पाहून पर्यटक हताश होतात. त्यामुळे या वखारीचे ऐतिसाहिक महत्त्व कायम ठेवून वखारीचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. या वखारीला ऐतिसाहिक वारसा असल्यान वखारीला नवीन लूक देताना या वखारीचे बाह्यरूप, पदचिन्ह, रंगकामाजा दर्जा कायम ठेवण्याचे प्रयत्न करण्यात येतील असे पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले. या वखारीचे जतन करण्याची गरज स्थानिकांनी व पर्यटकांनी व्यक्त केली आहे. वखारीचे संवर्धन केल्यास पर्यटनाला चालना मिळेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे. या वखारीला नवीन लूक देताना त्यात पुरातन वस्तुसंग्रहालय व अद्ययावत कला दालन करण्याची योजना आहे. या वखारीसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याची मागणी केल्याचे वायकर म्हणाले.

वखारीला ऐतिहासिक वारसा
इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून 1649 मध्ये राजापूरला ही वखार बांधली. पुढे 1708 मध्ये ही वखार बंद झाली. या वखारीला ऐतिहासिक वारसा असल्याने राजापूर तालुक्यातील इतर अनेक वैभवांमध्ये या वखारीची गणना करण्यात येते. एकेकाळी दिमाखात असलेली ही वखार आता जीर्ण झाली आहे. सध्या ही वखार राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित आहे.