राजिवली ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेचे तुकाराम येडगे

नवनियुक्त उपसरपंच तुकाराम येडगे यांना शुभेच्छा देताना जि.प उपाध्यक्ष संतोष थेराडे , संतोष येडगे , जयवंत बने व इतर पदाधिकारी.

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यात अटीतटीच्या ठरलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीपैकी राजिवली ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेचे तुकाराम येडगे बिनविरोध निवडुन आले.

येथील निवडणूक प्रतिष्ठेची करत जिल्हा परीषद उपाध्यक्ष संतोष थेराडे व भाजप उपजिल्हाध्यक्ष सुर्यकांत साळुंखे आमने – सामने आले होते. या चुरशीच्या निवडणुकीत बाजी मारत शिवसेनेने आपला सरपंच निवडून आणला होता. ७ पैकी चार जागा भाजपला गेल्या आणि सरपंचपदासह ३ जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. राजीवली ग्रामपंचायत निवडणूक पार पडून दोन महीन्याचा कालावधी लोटला. ग्रामपंचायत सदस्यांची मुदत २८ डिसेंबरला संपत असल्याने उपसरपंचपदाची निवडणुक लांबणीवर पडली होती. शुक्रवारी अखेर हा निवडणुक कार्यक्रम घेण्यात आला. या निवडणुकीत प्रभाग क्र.३ मधील शिवसेनेचे उमेदवार तुकाराम येडगे यांनी उपसरपंचपदासाठी उमेदवारी दाखल केला होता. निवडणुक वेळेत प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून अर्ज न दाखल झाल्याने तुकाराम येडगे यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणुक निर्णय अधिका-यांनी केली.

राजिवली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा सरपंच विजयी झाला. मात्र त्या ठिकाणी शिवसेनेचा उपसरपंच बसावा यासाठी जि.प उपाध्यक्ष संतोष थेराडे यांनी विशेष प्रयत्न केले. संतोष थेराडे व संतोष येडगे यांच्या सकारात्मक सहकार्यामुळेच आपण उपसरपंच झालो असल्याचे तुकाराम येडगे यांनी यावेळी सांगितले.

निवडणुक कार्यक्रमाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम गिते यांनी पाहीले तर कडवईचे ग्रामविस्तार अधिकारी राजेशिर्के यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ग्रामसेवक गायकवाड , ग्रामसेवक सुनिल जाधव , ग्रामसेवक हराळे आदी उपस्थित होते.