राहुल कोसंबी

11

>>शुभांगी बागडे<<

सामाजिक प्रश्न, समस्या आणि त्या अनुषंगाने येणारे विषय यासाठीची वैचारिक बैठक पक्की असली की त्याबाबतच्या प्रतिक्रियांमध्येही कोणतेच अधिकउणे राहात नाही. अशी वैचारिक बैठक आपल्या कसदार लेखणीतून मांडणारे लेखक म्हणजे राहुल कोसंबी. नुकताच राहुल कोसंबी यांच्या ‘उभे-आडवे’ या वैचारिक लेखसंग्रहाला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला. तिशीच्या उंबरठय़ावर लाभलेला हा मानाचा पुरस्कार त्यांच्या लेखनाची दखल घेण्याजोगा आहे. साहित्य अकादमीसारख्या दीर्घ परंपरा असणाऱ्या संस्थेकडून या कैचारिक लेखनाचा गौरक होणं ही आनंददायी गोष्टच. आजची सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक परिस्थिती सर्वार्थाने बदललेली आहे, पण त्याचबरोबर ती अस्वस्थ करणारी आहे. ही अस्वस्थता राहुल कोसंबी यांनी ‘उभं-आडवं’मधील लेखांमधून निर्भीडपणे व्यक्त केली आहे. समाजरचनेतील धर्मभेद, वर्णव्यवस्था, रूढी-परंपरा, जातीयवाद यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण करत शोषितांच्या प्रत्यक्ष जगण्यावर लक्ष केंद्रित करणारं हे पुस्तक. या लेखनाद्वारे विविध सामाजिक प्रश्नांचा मागोवा घेत राहुल कोसंबी यांनी अतिशय परखड व स्पष्ट वैचारिक भूमिका मांडली आहे. राहुल कोसंबी गेली दहा ते बारा वर्षे अत्यंत चिकित्सक वृत्तीने सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लेखन करत आहेत. आपल्या लेखनाचा आयाम तात्पुरता न राहता एक ठोस विचारसरणी त्यातून प्रकट व्हावी ही प्रत्येक लेखकाची अपेक्षा असते. राहुल कोसंबी यांचे लेखन याबाबतीत निश्चितच उजवे ठरते. एकांगी भूमिका न घेता संदर्भांसह, अनुभवांसह घटनांचे आकलन करत त्याआधारे केलेले त्यांचे लेखन म्हणूनच कसदार ठरते. संशोधकाच्या तटस्थ भूमिकेतील हे लेखन म्हणूनच विद्रोही न होता सकारात्मक, वैचारिक, सजग भूमिका मांडणारे ठरते. सखोल विश्लेषणात्मक लिखाण हे राहुल कोसंबी यांचे वैशिष्टय़. राहुल कोसंबी आपला समाजशास्त्राचा अभ्यास मर्यादित न ठेवता तो लेखनातून विविध अंगांनी मांडण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. ज्यामुळे त्यांचे लेखन अधिक वास्तववादी ठरते. सामाजिक संकल्पनांना वेगळ्या कंगोऱ्यातून मांडत, वेगळ्या विषयांवर लिहिण्याची आस राहुल यांनी जपली आहे. शोषितांचा कोंडमारा, साहित्य, संस्कृती, दलित अत्याचार असे अनेक विषय त्यांच्या लेखनात आढळतात. राहुल कोसंबी यांनी लोकवाङ्मय गृह या प्रकाशन संस्थेत ग्रंथनिर्मिती, संपादन अशा महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. हा अनुभव घेत ते आता मुक्त शब्द या प्रकाशन संस्थेतही संपादकीय सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सध्या राहुल कोसंबी नॅशनल बुक ट्रस्ट या महत्त्वाच्या संस्थेत मराठी व कोकण विभागाची संपादकीय जबाबदारी सांभाळत असून वाचन चळवळ वाढवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यासोबतच ‘दलितांमध्ये उदयाला येणारा मध्यमवर्ग’ या विषयावर त्यांचा अभ्यास सुरू असून पीएच.डी.ची तयारी करत आहेत. राहुल कोसंबी यांच्या लेखनाला दिशा मिळाली ती भालचंद्र नेमाडे यांच्या लेखाला दिलेल्या प्रतिक्रियापर लेखातून. जी खुद्द नेमाडेंनाही खूप भावली होती. विचारांना प्रकट करताना त्यांच्याशी असलेला प्रामाणिकपणा राहुल कोसंबी यांच्या लिखाणात ठायी ठायी जाणवतो. हेच त्यांच्यातील लेखकाचे यश आहे, असे म्हणावे लागेल.