लोकसंस्कृती…छम छम

डॉ. गणेश चंदनशिवे, [email protected]

घुंगरू… महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील नृत्याचा आत्मा… घुंगरू केवळ नृत्यापुरतेच नव्हे तर रोजच्या जगण्यातही सापडतात…

महाराष्ट्र ही संत, तंत आणि पंतांची भूमी आहे. इथे प्रत्येक बारा कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजा बदलतो. इथल्या जत्रा, यात्रा, महोत्सव आदी बदलताना आपणाला दिसतात. रूढी, परंपरा या रूपाने आतापर्यंत ‘सामना’ वर्तमानपत्रातील ‘फुलोरा’च्या रूपाने माझ्या लोकसंस्कृतीला भरभरून प्रतिसाद दिलात. उभ्या महाराष्ट्राने माझे ‘लोकसंस्कृती’ सदर अक्षरशः डोक्यावर घेतले. इथल्या रूढी, परंपरा, यज्ञयाग, यातु, क्रिया यावर माझ्या अकलनानुसार मी मौखिक पद्धतीने चालत आलेल्या परंपरांना आपणासमोर लिखित स्वरूपात मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. आपण दिलेल्या मराठी लोकसंस्कृतीला माझा शतशः प्रणाम. उभ्या महाराष्ट्राचे मी आभार व्यक्त करीत आहे.

महाराष्ट्राचा मराठी माणूस जसा उपासना, विधी आणि परंपरेशी जोडला आहे तसाच तो स्वरंजनासाठी जगताना आपण पाहतो. जसा ‘कानडा विठ्ठलु’ आपण म्हणतो तसा ‘कानडा मल्हार’ही आपल्या संस्कृतीत रूढ झालेला आपण पाहिला आहे. वारकऱयांची परंपरा आपल्याकडे चक्रधरापासून सुरू होते. ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, जनाबाई, नामदेव, चांगदेव, तुकाराम, एकनाथ, चोखामेळा या आणि अशा अनेक संतांपर्यंत पाहावयास मिळते. संतांप्रमाणे शाहिरी परंपरा आपल्याकडे खूप मोठी आहे. परशुराम, राम, जोशी, प्रभाकर, अनंतफंदी, सगनभाऊ, भाऊ फक्कड, पठ्ठेबापूराव ते अण्णाभाऊपर्यंत अनेक शाहिरांनी तमाशा कला जगवण्यासाठी आपले योगदान दिले. मराठी रांगडा माणूस जसा मृदुंगटाळांत रमतो तसाच तो चाळांतही रंगतो असे म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्राची लोकसंस्कृती जशी टाळांची आहे तशीच चाळांचीही आहे. भगवंताची भक्ती करताना आत्मानंदासाठी आणि स्वरंजनासाठी तो तमाशाच्या बारीला जायला विसरत नाही. म्हणूनच महाराष्ट्राला जशी वारीची परंपरा आहे तशीच बारीचीही परंपरा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

तमाशातील ढोलकी म्हटलं तर लावणी आलीच आणि लावणी म्हटलं तर लावण्यवतीच्या पायातले चाळ आले. चाळ म्हणचे घुंगरू. घुंगराचा शोध कधी लागला हे मात्र निश्चितपणाने सांगता येणार नाही. मात्र घुंगराच्या नादाने अनेक रसिकांच्या मनाला भुरळ पाडली हे मात्र निश्चित! घुंगरू म्हणजे शिस्त. ही शिस्त आपणाला पाळीव प्राण्यांपासून ते मानवप्राण्यांपर्यंत पाहावयास मिळते. बैलांच्या गळय़ात घुंगूरमाळा घालतात. त्याच्या नादात शेकडो मैल कधी ते पादाक्रांत करायचे हेच कळत नसे. घाटी, माळा आणि चाळ आतापर्यंत मराठी मनाला गवसणी घालताना आपण पाहिले. लावण्यवतीच्या पायातील घुंगरू हे एकसुरी असतात. पाच पाच किलोचे चाळ पायात बांधून त्या नृत्य करीत असतात. लोकनृत्याकडून मिळालेली प्रसादी शास्त्रीय नृत्यानेही घेतली आणि म्हणूनच भरतनाटय़म, कथ्थकसारख्या शास्त्रीय नृत्यात तालासाठी घुंगरू पायात बांधण्याची परंपरा रूढ झाली. ताल, लय, ठेका, ठहेराव यासाठी नृत्यात घुंगरांना महत्त्वाचे स्थान आहे.