वारली चित्रकलेचा जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे निधन


सामना प्रतिनिधी । वाणगाव

लाखो-करोडो घरांच्या ड्रॉइंग रूमच्या भिंती वारली चित्र संस्कृतीने सजविणारा व ही चित्रकला सातासमुद्रापार नेणारा अनोखा चित्र जादूगार जिव्या सोमा म्हसे यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. राष्ट्रपती पुरस्कार व पद्मश्रीसह अनेक सन्मान मिळविणाऱ्या म्हसे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे आदिवासी संस्कृती व वारली चित्रकला जगाच्या कॅनव्हासवर चितारणारा महान चित्रकार हरपला असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर जिव्या सोमा म्हसे यांनी वारली चित्रकलेला जगमान्यता मिळवून दिली. पालघर जिह्याच्या गंजाड या दुर्गम भागातील कलमीपाडा येथे १ जून १९३४ रोजी त्यांचा जन्म झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. आज पहाटे त्यांचे निधन झाल्याचे समजताच पालघर जिह्यातील त्यांच्या चाहत्यांनी घरी जाऊन म्हसे कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पत्नी पवनी तसेच सदाशिव, बाळू व विठ्ठल ही तीन मुले आणि ताई व वाजी या दोन मुली असा परिवार आहे. वारली चित्रकलेच्या क्षेत्रात गेली ६६ वर्षे मुशाफिरी करणाऱया म्हसे यांना १९७६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, तर २०१६ साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चित्रांमधून वारली संस्कृती, कला याचे अनोखे चित्रण त्यांनी केले.

जिव्या सोमा म्हसे यांनी काढलेली अनेक वारली चित्रे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर व परदेशातही पाहायला मिळतात. रशिया, इटली, जर्मन, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांमध्ये म्हसे यांची चित्रकला पोहचली आहे. त्यांच्या वारली पेटिंगवर खूश होऊन बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना १७ लाख रुपयांचे बक्षीस दिले होते, तर जपानच्या मिथिला म्युझिअमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्तेदेखील त्यांचा गौरव करण्यात आला. पालकमंत्री विष्णू सवरा, पालघर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा, आमदार अमित घोडा, संजय पोतनीस, मंगेश कुडाळकर, शिवसेना पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, डहाणूचे नगराध्यक्ष भरत रजपूत, जिल्हाप्रमुख राजेश शहा यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अंत्यसंस्काराच्या वेळी जिव्या सोमा म्हसे यांना श्रद्धांजली वाहिली.