शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्षे होणार

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील साडेतेरा लाख शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० वर्षे करण्याची शिफारस खटुआ समितीने राज्य सरकारला केली आहे. मात्र ज्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची शासकीय सेवा सलग 33 वर्षे झाली असेल अशांना ६० पर्यंत मुदतवाढ देण्यात येऊ नये अशी सूचनाही केली आहे.

राज्यात शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी व अधिकारी वर्गाची संख्या जवळपास साडेतेरा लाख आहे. सध्याच्या नियमानुसार५८ व्या वर्षी निवृत्ती कायम ठेवल्यास पुढील ३ वर्ष जवळपास ६९ हजार अधिकारी-कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांची वाढती संख्या आणि पेन्शनधारकांची संख्या वाढणार आहे. सोबतच या आर्थिक वर्षात सहावा वेतन आयोग राज्यात लागू करावा लागणार असून यामुळे जवळपास १५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा राज्य सरकारवर पडणार आहे. या सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे निवृत्ती वय ६० वर्ष केल्यास पेन्शनवर होणारा खर्च कमी होऊ शकतो, अशी चर्चा आराखडा करणाऱ्या समितीत सुरू आहे.