सखेसोबती…गिधाडं कमी होताहेत…

योगेश नगरदेवळेकर, [email protected]

सह्याद्रीत एकवेळ  गरुड बघायला मिळेल, पण गिधाड पहायला मिळणं हे दुर्मिळ झालं आहे.

AMK (अलंग, मदन आणि कुलंग) किल्ल्याच्या त्रिकुटातील अलंग पूर्ण करून आम्ही मदनच्या माथ्यावर पाय ठेवला. समोर प्रचंड अलंगचा माथा दिसत होता आणि अचानक आमचं लक्ष समोरच्या डोंगराच्या कपारीत गेलं. डोळय़ावर विश्वास बसेना. त्या कपारीत गिधाडांची तीन घरटी होती. एका घरटय़ाच्या दारात गिधाड बसलेलं. आम्ही तर हरखून गेलो. हा तर बोनसच होता.

सहय़ाद्रीत एकवेळ गरुड बघायला मिळेल, पण गिधाड पहायला मिळणं हे दुर्मिळ आहे. अर्थात बऱयाच जणांना प्रश्न पडतो की,मेलेल्या जनावरांवर जगणारे गिधाड काय शोधत फिरायचं? त्याचं कारण आहे अतिशय घाण दिसणारे हे पक्षी आसमंत स्वच्छ असण्याचे इंडिकेटर आहेत. शहरात कावळय़ांचे जे स्थान आहे जवळपास तेच स्थान जंगलात गिधाडांचे आहे. जरा विचार करा शहरातून कावळे हद्दपार झाले तर… तर रस्त्यात मरून पडलेल्या उंदीर-घूस किंवा इतर प्राण्यांची विल्हेवाट कशी लागेल. ते मेलेले प्राणी तसेच सडून शहरात रोगराई पसरवतील. अगदी हेच काम जंगलात गिधाडं करीत असतात. एखादा प्राणी मेला की आकाशात उंचावर घिरटय़ा घालत असणारी गिधाडं टोळीने खाली उतरतात आणि त्या मृत प्राण्याचा फन्ना उडवतात. हे दृश्य बघायला जरी भयाण असलं तरी नैसर्गिक चक्राच्या दृष्टीने अगदी आवश्यक गोष्ट आहे. जंगल सुस्थितीत ठेवणारे हे स्वच्छता दूतच आहेत.

वाकडय़ा कणखर चोचीचे आणि मानेवरचे केस झडल्यासारखे पिसे दिसणारे त्याचे रूप ओंगळवाणे असले तरी त्याच्या भक्ष्य खाण्याच्या दृष्टीने ते सुरेखच आहे. बाकदार, कणखर चोचीमुळे मेलेल्या प्राण्याची कातडी फाडणे, आतले अवयव खेचून काढणे अतिशय सोपे जाते. या चोचीने तो स्वतःचे शरीर स्वच्छ करू शकतो, पण स्वतःची मान करू शकणार नाही म्हणून मानेवरची पिसं निसर्गाने गायब केली.

असा हा दणकट पक्षी १९९० नंतर अचानक नाहीसा होऊ लागला. त्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत गेली. असं काय झालं की गिधाडांची संख्या झपाटय़ाने कमी झाली? पहिलं कारण म्हणजे ‘डायक्लोफेनॅक’ हे औषध. पाळीव जनावरांच्या म्हणजे गाय, बैल, म्हैस सारख्यांच्या आजारावर अत्यंत गुणकारी औषध बाजारात आलं. हे औषध टोचलेली जनावरं मेल्यानंतर गिधाडांनी जेव्हा यांना खाल्लं तेव्हा मृत जनावरांच्या शरीरातील डायक्लोफेनॅक हे गिधाडांच्या शरीरात जायचे आणि या औषधामुळे गिधाडांच्या लिव्हर, किडनीवर परिणाम होऊन गिधाड मरून जायचे.

दुसरं कारण होतं की, पूर्वी गावाबाहेर मेलेली ढोरं टाकायची जागा होती ती कालांतराने नष्ट झाली. गाव तेथे मृत जनावर टाकेनाशी झाले. अन्नाअभावी पण काही गिधाडांचा मृत्यू झाला. यातून जागे झाल्यावर डायक्लोफेनॅकवर बंदी घातली गेली. त्याचा वापर कमी करण्यात यश मिळाले. पण झालेले नुकसानच एवढे मोठे होते की ते भरून येण्यास बराच कालावधी जाईल. मात्र आता याबाबतीत आशेचा किरण दिसू लागला आहे. नगर जिल्हय़ात आणि नाशिक जिल्हय़ात काही ठिकाणी तर चक्क गिधाडं रेस्टॉरंट उभारण्यात आली आहेत. ठरावीक जागांवर संरक्षित कुंपण घालून त्यात ज्या मृत जनावरांत डायक्लोफेनॅक दिलेले नाही अशी मृत जनावर वैद्यकीय तपासणीनंतर त्या ठिकाणी टाकण्यात येतात. गिधाडांना संरक्षण आणि शाश्वत खाद्य मिळत असल्याने या रेस्टॉरंटला गिऱहाईकांचा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे व गिधाडांची संख्या वाढताना जाणवत आहे.

याच प्रकारचे कोकणातही श्रीवर्धन, राजापूर, फणसाड या ठिकाणी गिधाड संरक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे आणि गिधाडांची संख्या थोडी का होईना वाढत आहे हा आशेचा किरण यातून दिसत आहे.

निसर्गाला ओरबाडणं सहज सोपं आहे, पण त्याची भरपाई करणं महाकठीण काम आहे. कदाचित त्याची भरपाई आपल्या पुढच्या पिढीला करायला लागेल. ही वेळ येण्यापूर्वीच जागे होणे गरजेचे आहे.