सीमा देव, अपर्णा सेन यांना ‘पिफ जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

सामना ऑनलाईन । पुणे

हिंदुस्थानी चित्रपटसृष्टीमध्ये अलौकिक अभिनय आणि दिग्दर्शनाने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱया ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव आणि बंगाली अभिनेत्री, दिग्दर्शिका अपर्णा सेन यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (पिफ) जीवनगौरव सन्मान जाहीर झाला आहे, तर संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ज्येष्ठ तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

कोथरूड येथील सिटी प्राइड चित्रपटगृह येथे येत्या गुरुवारी (दि. १२ ) सायंकाळी ४.३० वाजता महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात सीमा देव, अपर्णा सेन आणि झाकीर हुसेन यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, समर नखाते, रवी गुप्ता, श्रीरंग गोडबोले आदी यावेळी उपस्थित होते. स्पर्धा विभागामध्ये व्हेंटिलेटर, डॉ. रखमाबाई, एक ते चार बंद, नदी वाहते, दशक्रिया, घुमा, लेथ जोशी या सात मराठी चिपटांची निवड करण्यात आली आहे.

महोत्सवामध्ये भरविण्यात येणाऱया पिफ बाजार या विभागामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक आणि निर्मात्यांची व्याख्याने होणार आहेत, तसेच मराठी लेखक आणि निर्मात्यांसाठी कार्यशाळा होणार आहेत. यामध्ये दिग्दर्शक चंद्रकात कुलकर्णी, रवी जाधव, बीना पॉल, श्रीनिवास संतानन आदी सहभागी होणार आहेत, असेही डॉ. जब्बार पटेल यांनी यावेळी सांगितले.