सुखी माणसांचा देश!

अमित घोडेकर, [email protected] hotmail.com

जगातील सगळ्यात जास्त आनंदी देशांच्या यादीत सगळ्यात पहिले नाव आहे फिनलँडचे. त्यानंतर डेन्मार्क, आईसलँड, स्विझर्लंड, नेदरलँडस्, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया हे देश वरच्या १० देशांमध्ये गणले जातात. आणि आपण चक्क १२९ व्या स्थानावर आहोत…

एका शाळकरी मुलाने फेसबुकवर त्याचा एक सेल्फी टाकला. त्याचा अंदाज होता की त्याच्या फेसबुक पोस्टला कमीत कमी ३०० तरी लाइक्स मिळतील, पण त्याला फक्त १५० च लाइक्स मिळाल्या. त्या मुलाला या गोष्टीचे एवढे दुःख झालं की त्याने चक्क आत्महत्या केली. आपल्या आजूबाजूला आपण आज-काल अशा अनेक घटना घडल्याचे बघतो किंवा ऐकतो त्यावेळेस असे वाटते की काय चाललंय हे? नुकताच एक जगप्रसिद्ध अहवाल सादर झाला आहे. हा अहवाल आहे जगातील सगळ्यात आनंदी देशांचा आणि आपण त्यात अगदी तळाला आहोत. म्हणजेच आपला हिंदुस्थान चक्क दुःखी देश आहे असेच म्हणावे लागेल.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात हिंदुस्थानचा क्रमांक आहे १३३.  हा निकष १५६ देशांच्या यादीतून काढला आहे. म्हणजेच आपला क्रमांक खालून पहिला आहे असेच म्हणावे लागेल. गेल्या वर्षी आपण या अहवालात १२९ व्या स्थानावर होतो पण आता चक्क आपण १३३ व्या स्थानावर घसरलो आहोत. तिकडे सतत बॉम्बस्फोट, दहशतवादी कारवाया, गरिबी, भ्रष्टाचार अशा अनेक आघाडय़ांवर सतत काही ना काही कारणाने चर्चेत असणारा आपला शेजारी पाकिस्तान चक्क ७५ व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान ७९ व्या स्थानावर होता. हे कमी की काय म्हणून तर आपल्या जखमेवर अजून मीठ चोळण्याचे काम केलेय भूतान ९७, नेपाळ १०१, श्रीलंका ११६ आणि नागीण डान्सवाला बांगलादेश पण ११५ व्या क्रमांकावर आहे. हिंदुस्थानचा आजकालचा सगळ्यात मोठा शत्रू चीन पण ८६ व्या स्थानावर आहs एकंदरीत काय तर आपण जगातला सगळ्यात दुःखी देश आहोत हे आता सिद्ध झालेय.

जगातील सगळ्यात जास्त आनंदी देशांच्या यादीत सगळ्यात पहिले नाव आहे फिनलँडचे. त्यानंतर डेन्मार्क, आईसलँड, स्विझर्लंड, नेदरलँडस्, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया हे देश वरच्या १० देशांमध्ये गणले जातात. अमेरिका आणि इंग्लंड चक्क १८ व्या आणि १९ व्या स्थानावर आहेत. अमेरिकेसारखा बलवान श्रीमंत देश असो किंवा इंग्लंडसारखा लोकप्रिय देश असो, यातला कोणीही सगळ्यात आनंदी नाही आणि सगळ्यात आनंदी देश चक्क फिनलँड आहे. म्हणजेच पैसा किंवा श्रीमंती जरी असेल तरी तुम्ही आनंदी असलाच असे काहीही नाही.

२०१५ पासून फिनलँडमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या एका हिंदुस्थानी मुलीने नुकतेच एका ब्लॉगवर फिनलँड हा का जगातील सगळ्यात आनंदी देश आहे याबद्दल लिहिले आहे, तिच्या मते फिनलँडमध्ये दिले जाणारे शिक्षण आणि आणि फिनिश संस्कृती हे फिनलँडच्या आनंदी असण्याचे गमक आहे. जवळपास सर्वच फिनिश लोक खूप उदारमतवादी आहेत आणि बऱयाच वेळेस फिनिश लोक आपला चांगूलपणा आपल्या कृतीतून दाखवून देतात. फिनलँडमध्ये येणारे पर्यटक देखील फिनलँडच्या संस्कृतीमध्ये खूप लवकर एकरूप होतात. फिनलँडमधील इतर अनेक चांगल्या गोष्टींबरोबरच आणखीन एक गोष्ट म्हणजे अप्रतिम निसर्गरम्य वातावरण. खरे तर आपल्या देशातही हे सगळे आहे पण तरी देखील जगातील सगळ्यात दुःखी लोकांच्या देशांत आपली गणना व्हावी आणि प्रत्येक वर्षी आपण अजून खाली खाली जाणे हे काही हिंदुस्थानसारख्या देशाला अजिबात भूषणावह नाही. एकीकडे आपण तंत्रज्ञान कसे चांगल्या प्रकारे वापरत आहोत याचे ढोल बडवले जात आहेत  तर दुसरीकडे आपले प्रतिव्यक्ती उत्पन्न कसे वाढले जात आहे हेदेखील सांगितले जाते. आ अहवाल  सगळ्या हिंदुस्थानी बुद्धिवादी आणि सरकारसाठी डोळ्यांत अंजनच आहे. आनंदी नाही पण कमीत कमी दुःखी तरी नका करू असेच म्हणावे लागेल.