स्पार्टन मुंबई श्रीच्या चषकाचे अनावरण

238

सामना प्रतिनिधी। मुंबई

मला फार चीड येतेय, मी आता का खेळत नाहीय… असं वाटतंय या ट्रॉफीसाठी का होईना, पुन्हा एकदा मुंबई श्रीच्या मंचावर उतरावं… ही ट्रॉफी जिल्हा अजिंक्यपदाची नव्हे तर जगज्जेतेपदाची वाटतेय… अन् ती पाहताच ट्रॉफी, कलिजा खल्लस झाला…शरीरसौष्ठव क्षेत्रातील दिग्गजांच्या एकापेक्षा एक अशा भावनांनी स्पार्टन मुंबई श्रीच्या किताब विजेत्या चषकाचं मोठ्या धुमधडाक्यात अनावरण करण्यात आलं. अद्वितीय… अप्रतिम… जबरदस्त… अशी विशेषणंही कमी वाटावीत इतक्या सुंदर चषकाची पहिली झलक पाहिल्यानंतर हा चषक आपल्याकडेच आला पाहिजे, यासाठी मुंबईच्या पीळदार शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या वर्कआऊटला आणखी जोर लावल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबई शरीरसौष्ठवाची प्रतिष्ठा असलेली स्पार्टन मुंबई श्री यंदा इतिहास घडवणार, याची पहिली झलक चषक अनावरण सोहळ्याच दिसली. मुंबईच्या शरीरसौष्ठवाला खऱया अर्थाने श्रीमंत करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई श्रीच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलणाऱया आरोग्य प्रतिष्ठानने चषक अनावरण सोहळ्यालाच उपस्थित शरीरसौष्ठव संघटक आणि शरीरसौष्ठवपटूंची मनं जिंकली. भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सर्वेसर्वा चेतन पाठारे आणि मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अमोल किर्तीकर, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनिल शेगडे, ऍड. विक्रम रोठे आणि स्पार्टन न्यूट्रिशियनचे वृषभ चोकसी या शक्तीशाली संघटकांच्या उपस्थितीत चषकाचे अनावरण करण्यात आले. चषकाची पहिली झलक पाहताच उपस्थितांनी अद्वितीय अशी दाद दिली. चषकाचं रूप पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. इतकी कल्पक, भव्यदिव्य ट्रॉफी आजवर कोणत्याही स्पर्धेला देण्यात आली नसावी. ती ट्रॉफी पाहून सारेच तिच्या प्रेमात पडले. त्यामुळे तिला जिंकण्यासाठी पुन्हा एकदा दोनशेपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये जोरदार द्वंद्व रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.

आपली प्रतिक्रिया द्या