स्वा. सावरकर – योगी क्रांतिकारक

अरुण जोशी

सावरकरांचे राजकीय आयुष्य केवळ दहा वर्षांचे होते. सावरकर क्रांतिकारक नव्हते, ते क्रांतीचे कारक होते. सावरकर एखाद्या योग्यासारखे जगले. त्यांनी हिंदुजनांना चेतना दिली, चैतन्य दिले त्यांचे विचार हे प्रत्येक काळाला अनुसरून होते व प्रत्येक काळाला अनुकूल ठरतो म्हणून आपल्याला वाटते की सावरकर काळाच्या पुढचा विचार करायचे. उलटपक्षी सावरकर हे काळाशी सुसंगत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारसरणी आणि कृती ही केवळ तत्कालीन व्यवस्थेशी निगडित नव्हती तर त्यांचे विचार हे प्रत्येक समकालीन संस्कृतीशी साधर्म्य सांगणारे होते. त्यामुळेच त्याला आजदेखील महत्त्व आहे. ही विचारसरणी कुठल्याही चौकटीत मर्यादित राहात नाही तर ती अधिकाधिक व्यापक प्रमाणावर विस्तारीत होते. उदाहरणच द्यायचे झाले तर तात्यारावांनी केलेली हिंदुत्वाची व्याख्या. ते म्हणतात, जे बौद्ध, जैन, शिख व चार्वाक पंथ हे वेद मानीत नाहीत म्हणून काय त्यांना हिंदू मानायचे नाही का? त्यांनी हिंदुजनांना चेतना दिली, चैतन्य दिले त्यांचे विचार हे प्रत्येक काळाला अनुसरुन होते व प्रत्येक काळाला अनुकूल ठरतो म्हणून आपल्याला वाटते की सावरकर काळाच्या पुढचा विचार करायचे. उलटपक्षी सावरकर हे काळाशी सुसंगत होते. नुकत्याच सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी व्यक्त केलेल्या विचारानुसार या देशात राहणाऱ्या प्रत्येक धर्माच्या नागरिकाची ओळख ही हिंदू आहे, हिंदू संस्कृतीशी त्यांची बांधिलकी आहे. हा विचार सावरकरांनी फार पूर्वीच सांगितला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वैचारिक कार्याची अधिक ओळख होते ते त्यांच्या रत्नागिरीच्या वास्तव्यात केलेल्या कार्यामुळे. तिथल्या १३ वर्षांच्या काळात त्यांनी अनेक चळवळी यशस्वी केल्या. यात जातीभेद, अस्पृश्यता, भाषाशुद्धी, स्वदेशी, साक्षरता प्रसार यांचा समावेश आहे. १९३७ च्या कर्णावतीच्या भाषणात सावरकर हिंदुराष्ट्राविषयी आपले विचार प्रकट करताना संघटनात्मक पातळ्यांवर कार्य करण्याची प्रेरणा दिली होती. सामाजिक, राजकीय नि सांस्कृतिक अशा सर्वच अंगांनी हिंदुराष्ट्राच्या भवितव्याला आकार देणारी ती एक अखिल हिंदू संघटना असावी व अशा संघटनांच्या माध्यमातून अखिल हिंदूंनी एकत्र यावे, अशी त्यांची त्यामागची भूमिका होती. त्यांच्या भाषणात एके ठिकाणी हिंदुस्थान हे एकता पावलेले नि विसंवादरहित राष्ट्र मानता येत नाही तर उलट हिंदुस्थानात हिंदू आणि मुसलमान अशी दोन राष्ट्रे अस्तित्वात आहेत असे वाक्य आहे. यावरून विनाकारण सावरकरांच्या विरोधकांनी सावरकरांनी द्वीराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, अशी गरळ ओकायला सुरुवात केली. मुळात मुस्लिम हे राष्ट्र मानीत नाही. ते एकाच प्रार्थनास्थळाला मानतात. त्यामुळे हिंदू हे राष्ट्र आहे ही संकल्पनाच मुस्लिमांना मान्य नाही, याअर्थाने सावरकरांनी वरील भाष्य केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शत्रूने ज्याची स्तुती केली ते तात्याराव सावरकर. लंडनमध्ये एका चौकात सावरकरांचा अर्धकृती पुतळा आहे. तो तिथे बसवू नये म्हणून conservative पक्षाने वाद घातला. परंतु सरकारने सांगितले, “इंग्लंडच्या शत्रूंमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहेत त्यातील सावरकर हे एक. इंग्लंड भाग्यवान राष्ट्र आहे त्याला सावरकरांसारखा चारित्र्यसंपन्न, प्रखर राष्ट्रभक्त व कमालीचा बुद्धिमान शत्रू मिळाला. सावरकरांनी भरकटलेल्या तरुणांना लेखण्या मोडा आणि बंदुका घ्या, हा दिव्य संदेश दिला. निजामाच्या राज्यात बहुसंख्य हिंदू प्रजेवर अत्याचार होत होता व त्यांचे धर्मस्वातंत्र्य,नागरिक स्वातंत्र्य निजामाने बळकावून घेतले, त्याविरुद्ध या अधिवेशनात आंदोलन करण्याचे ठरले. सावरकर या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे हे आंदोलन जातीय झाले आहे असे सांगून गांधींनी स्टेट कॉंग्रेस आणि आर्य समाजाला आंदोलन स्थगित करायला सांगितले. परंतु आर्य समाजाचे १७००० व हिंदू महासभेचे ४००० हिंदुभूमिपुत्र व सेनापती बापट यांनी लढ्यात भाग घेतला.

१९३९ मध्ये तात्यारावांनी बंगालच्या हिंदूंना सावध व संघटित राहण्याचा गुरुमंत्र दिला. १०४० साली तामीळनाडू, केरळमध्ये अनेक ठिकाणी जिल्हा व नगर येथे हिंदू संघटनांचे जोरदार कार्य केले. त्यासाठी कुठलेही काम त्यांना लहान वाटले नाही. दुसऱया महायुद्धाच्या वेळी२३ मार्च १९४२ या दिवशी ब्रिटनचे मंत्री स्टिफर्ड क्रिप्स हिंदुस्थानात आले. एकीकडे युद्ध समाप्तीनंतर देशाला स्वराज्य व प्रांतांना स्वतंत्र घटना बनविण्याची योजना तर दुसरीकडे संस्थानांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याची सवलत आणि संघराज्य होईपर्यंत संरक्षण मंत्रालयावर ब्रिटनचे नियंत्रण, अशी विचित्र आणि विक्षिप्त योजना घेऊन क्रिप्स आले होते. त्याला नेहरूंसकट अनेक नेते भाळले. परंतु सावरकरांनी क्रिप्सला चांगलेच ओळखले, सावरकरांनी ती योजना फेटाळून लावली. चर्चेच्या वेळी क्रिप्स तात्यारावांना कॅनडा, द. आफ्रिकेची उदाहरणे देऊ लागले. तेव्हा सावरकर म्हणाले, हिंदुस्थान हा एक अखंड देश असल्याचे तुमच्याच शासनाने मान्य केले आहे. इंडियन आर्मी, इंडियन रेल्वे असे तुम्हीच म्हणता, स्वयंनिर्णयाचे तत्त्व देशाला लागू असते प्रांतांना नाही. यावर क्रिप्स निरुत्तर झाले.

सावरकरांचे राजकीय आयुष्य केवळ दहा वर्षांचे होते. सावरकरांचे नेतृत्व कॉंग्रेसला परवडणारे नव्हते. सावरकरांनी विचाररूपी वृक्ष लावून आपल्यावर उपकार केले आहेत. सावरकर क्रांतिकारक नव्हते, ते क्रांतीचे कारक होते. सावरकर एखाद्या योग्यासारखे जगले. संसार थाटूनही ते वैरागी होते तुकाराम महाराजांसारखे. त्यांचा शेवट संतांनाही हेवा वाटावा असा झाला. त्यांचे डोळे समाधीनंतरही उघडेच होते.जणू ते त्यांच्या तेजस्वी डोळ्यांनी सर्वांना भासवत होते की, संबंध ब्रह्मांडच मी माझ्या डोळ्यांत सामावले आहे. धन्योहम्, धन्योहम्…

(लेखक स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबईचे अध्यक्ष आहेत.)