क्रेडिट कार्डची माहिती वापरून पावणेदोन लाख हडप

94

सामना ऑनलाईन | नाशिक

नाशिकमधील एका नोकरदाराच्या क्रेडिट कार्डची माहिती मिळवून चोरटय़ांनी त्यांच्या खात्यातील 1 लाख 79 हजार 188 रुपये परकीय चलनात बदलून घेत हडप केले. क्रेडिट कार्डधारकांनी गरज नसताना आपली परकीय चलन बदलण्याची सुविधा बंद ठेवण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

नाशिकमधील एक नोकरदार काही दिवसांपूर्वी विदेश यात्रेसाठी गेले होते. तेथून परतल्यावरही त्यांनी आपल्या ऑक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डची फॉरेन ट्रान्झॅक्शन सुविधा सुरूच ठेवली. त्यांच्या क्रेडिट कार्डची माहिती वापरून 30 मे रोजी मध्यरात्री 2.14 ते 2.21 या वेळेत चोरटय़ांनी 1 लाख 79 हजार 188 रुपयांचे हिंदुस्थानी चलन अमेरिकन डॉलरमध्ये बदलवून घेत ऑनलाईन व्यवहार केला. या प्रकारच्या व्यवहाराचा ओटीपी येत नसल्याने ही घटना तक्रारदाराच्या लक्षात येण्यास वेळ लागला. मात्र, खात्यातून पैसे गेल्याचा संदेश प्राप्त होताच त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. चोरटय़ांनी तक्रारदाराच्या क्रेडिट कार्डची माहिती कशी मिळविली, याचा शोध सुरू असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या