बिअर बारचे शटर उचकटून १ लाखाची दारू चोरली

सामना प्रतिनिधी । वैजापूर

उक्कडगाव रस्त्यावरील शंभुराजे बिअर बार फोडून चोरट्यांनी १ लाख १३ हजार रुपये किमतीची विदेशी दारू लंपास केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

वैजापूरहून कोपरगावकडे जाणाऱ्या उक्कडगाव रस्त्यावर कैलास लांडे यांच्या मालकीचे शंभुराजे बिअर बार हे हॉटेल आहे. शनिवारी सकाळी ते हॉटेल उघडण्यासाठी आले असता त्यांना बारचे शटर उचकटलेले दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहिल्यानंतर हॉटेलमधील वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या चोरीस गेल्याचे लक्षात आले. १ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीची विदेशी दारू चोरी झाल्याचे आढळून आले. याप्रकरणी कैलास लांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामहरी जाधव करीत आहेत.