पेणच्या खाडीतून समुद्री तस्करांना अटक, 44 लाखाचा माल जप्त


राजेश प्रधान । पेण

पेण तालुक्यातील दादर, वशेणी खाडीला समुद्री चाचांचा विळखा पडला असून समुद्र किंनाऱ्या लगत असणाऱ्या दादर सागरी, मांडवा, रेवस, धरमतर इत्यादी भागात उभ्या असणाऱ्या मालवाहू जहाजातील ऑईल/डीझेलची व तत्सम वस्तूंची जबरी चोरी करून इतरांना माल विकणारी टोळी कार्यरत असल्याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना गोपनीय सूत्रांकडून मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पो.नि. जे.ए.शेख यांनी दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दादर, वशेणी खाडीत धाड टाकून दहा समुद्री तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पेण तालुक्यांतील दादर गावचे हद्दीतील संतोषी वाडी येथील खाडीच्या किनाऱ्यालगत गेल्या काही महिन्यांन पासून दादर गाव, दादरबेडी, वशेणी, कळवे गावांतील काही इसम कंपनीत जाणांऱ्या मालवाहू जहाजातील डिझेल, ऑईल, व लोखंड तसेच कडधान्ये यांची शस्त्रांचे धाक दाखवू लुटमार करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे.ए.शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सस्ते, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग आणि त्यांच्याकडील पोलीस पथकाने सापळा रचून छापा टाकला असता घटनास्थळावरून चंद्रकांत धर्माजी पाटील आणि गुड्डू चिंकू भारती यांना ताब्यात घेतले. त्यांचे ताब्यातून 200 लिटर मापाचे एकूण 29 ड्रम (4,800 लिटर) बेस ऑईल (ऑईल-60), द्रव पदार्थांची वाहतूक करण्याकरिता विशीष्ठ कप्पे केलेली एक होडी, एक टेम्पो असा माल हस्तगत केला. अधिक चौकशी करिता छापा टाकन्यापूर्वी अन्वर मलिक या आरोपीने 200 लिटर मापाचे एकूण 45 ड्रम (9,000 लिटर) बेस ऑईल (ऑईल-60) टेम्पो द्वारे नेल्याने अन्वर मलिक यांस ताब्यात घेऊन त्यांचेकडून सदरचा माल जप्त करण्यात आला व मालवाहू टेम्पो देखील जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्यातील अटक आरोपी यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास करता सदर मालाची मुबई किनाऱ्यालगत असलेल्या माल वाहतूक करणाऱ्या मोठ्या जहाजातून चोरी करणाऱ्या इकरार महमद अलीखान, बजरंगी चंद्रिका यादव, सुलेमान मौजीद मंडल, अनवर कलाम सरदार यांना तसेचे सदरचा माल बाजारात नेहून विक्री करणाऱ्या अन्वर हबीबुल्ल्ला मलिक याला आणि सोबत वाहतुकीकरता आणलेल्या टेम्पो वरील चालक सोहेल अत्तार अब्दुल रशीद यांना देखील अटक करण्यात आलेली आहे.

या कारवाईत 200 लिटर मापाचे एकूण 74 ड्रम (14,800 लिटर) बेस ऑईल (ऑईल-60), द्रव पदार्थाची वाहतूक करण्याकरिता विशिष्ठ कप्पे केलेल्या दोन नौका, दोन टेम्पो इत्यादी असा 44 लाख 45 हजार 500 रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आलेला असून एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे.