बाप्पाच्या लाडक्या मोदकांचे दहा प्रकार

सामना ऑनलाईन। मुंबई

आठवड्याभरावर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. यामुळे सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. थोड्याच दिवसाट विविध प्रकारचे रेडिमेड मोदकही बाजारात येणार आहेत. पण थोडी कल्पकता वापरून तुम्हीही घरात विविध प्रकारचे मोदक बनवू शकता.

fried-modak

गव्हाच्या पीठाचे मोदक (तळणीचे मोदक)

साहित्य :-१ कप मैदा,पाव कप बारीक रवा,२ चमचे मोहन, चवीनुसार मीठ, दीड कप खोबऱ्याचा किस, एक वाटी साखर, १ चमचा खसखस
६ बदाम, ५ काजू, १ चमचा वेलची पूड, वाटीभर कोमट दूध, तळणीसाठी तेल.

कृती...प्रथम मैदा, रवा, चिमुटभर मीठ हे सर्व एकत्र करून त्यात तुपाचे मोहन घालावे. दुधामध्ये कणिक मळून घ्यावी. सुकं खोबरं व खसखस मंद आचेवर भाजून घ्यावी. ही भाजलेली खसखस व खोबरं, साखर, बदाम, काजू व वेलचीची पूड करून घ्यावी. त्यात केशर घालावं. त्यानंतर मळलेल्या पीठाचे गोळे करून घ्यावेत. त्यात सारण भराव. सर्व मोदक तयार झाले की ते गरम तेलात तळून घ्यावे.

paneer-modak

पनीर मोदक

साहीत्य… 200 gm पनीर, दूध २ वाटी, तेल, चिमूटभर केसर, पाव किलो तांदळाचे पीठ.

कृती…पीठ उकडून घ्या. पनीर किसून घ्या. त्यात दूध, तूप, आणि केसर टाकून एकजीव करुन घ्या. नंतर उकडीच्या पीठात हे मिश्रण भरा. त्याला मोदकाचा आकार दया. गरम तेलात तळा. झटपट पनीर मोदक तयार.

keshari-modak

केशरी मोदक

साहीत्य...मैदा,रवा, केशर,साखर, नारळाचा किस,वेलची पावडर.

कृती...मैद्यात रवा व केशर टाकलेले दूध टाका. हे मिश्रण एकजीव मळून घ्या. एक पॅनमध्ये साखरेचे पाक बनवा. त्यात नारळाचा किस, वेलची पावडर, टाकून पाक ढवळून घ्या. हे मिश्रण कोमट असतानाच त्याचे मोदक बनवा.

moong-dal-modak

मूगाच्या डाळीचे मोदक

साहीत्य…पाव किलो खवा, 150 ग्रॅम मूगाची डाळ, अंदाजे तूप ,पाव वाटी काजू पावडर, साखर

कृती…कढईत तूप गरम करावे. त्यात खवा व मूगाची डाळ टाकावी. हे मिश्रण खरपूस भाजत असतानाच त्यात काजू पावडर व साखर टाकावी. मिश्रण थंड झाले कि त्याचे छोटे- छोटे गोळे बनवावे. त्याला मोदकाचा आकार द्यावा.

shrikhand-modak

श्रीखंडाचे मोदक

साहीत्य…१ वाटी तांदळाचे पीठ, पाव किलो श्रीखंड,ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर व केसर.

कृती...१ वाटी तांदळाच्या पीठाची उकड काढावी. पाव किलो श्रीखंड घ्यावे.त्यात ड्रायफ्रुटस, वेलची पावडर,आणि केसर टाकावे. उकडीच्या पीठाचे गोळे करावे. त्यात श्रीखंडाचे मिश्रण भरावे. मोदकाचा आकार द्यावा. गरम तेलात तळून घ्यावे.

choco-modak

चॉकलेट, अक्रोडचे मोदक

साहीत्य…अक्रोडची पावडर,चॉकलेटचे बारीक तुकडे, क्रेक क्रम्बस. १ वाटी तांदळाची उकड.

कृती...सर्वप्रथम अक्रोड पावडरमध्ये चॉकलेटचे तुकडे व क्रेक क्रम्बस.एकत्रित करावे. उकडीचे गोल गोळे बनवावे. त्यात हे मिश्रण भरावे. त्याला मोदकाचा आकार द्यावा.

gulkand-modak

गुलकंद मोदक

साहीत्य...खवा पाव किलो, गुलकंद चार चमचे, १ चमचा वेलची पावडर. मैदा पाव किलो.

कृती...कढईत कोरडाच खवा भाजून घ्यावा. त्यात गुलकंद व वेलची पावडर टाकावी. मैद्याचे पीठ मळून घ्यावे.
त्याचे गोळे बनवावे. त्यात वरील मिश्रण भरावे. मोदकाचा आकार द्यावा. गरम तेलात तळून काढावे.

cheese-modak

चीजचे मोदक

साहीत्य...मैदा पाव किलो, खवा 150 ग्रॅम, पाव वाटी क्रिम, ड्रायफ्रुट्स.

कृती...मैदा मळून घ्यावा. खवा भाजून घ्यावा. त्यात क्रिम आणि ड्रायफ्रुटस टाकावेत. मैद्याचे गोळे करावेत. त्यात हे मिश्रण भरावे. पीठाला मोदकाचा आकार द्यावा. गरम तेलात तळावे.

kazoor-modakखजूर मोदक

साहीत्य…मैदा पाव किलो, १ वाटी खजूराचा गर, ड्रायफ्रुटस, नारळाचा किस.

कृती...मैदाचे पीठ मळून घ्यावे. त्याचे गोल गोळे बनवावे. एका बाऊलमध्ये खजुराचा गर घ्यावा. त्यात ड्रायफ्रुटस, नारळाचा किस टाकावा. मिश्रण एकजीव करावे. पीठाचे गोळे करावे. त्यात हे मिश्रण भरावे. त्याला मोदकाचा आकार द्यावा. गरम तेलात तळावेत.

tilache-modakतीळाचे मोदक

साहित्य- अर्धी वाटी गूळ,भाजलेले सफेद तीळ, दीड वाटी गव्हाचे पीठ

कृती- गुळाचा पाक तयार करून घ्या. त्यात गव्हाचे पीठ टाका. मग तीळ टाका. हे मिश्रण थंड झाल्यावर मळून घ्या. त्यानंतर कणकेचे गोल गाळे करा. त्यात हे मिश्रण भरा. मंद आचेवर तेलात तळा.