१०० किलो सोयाबीन एका पिझ्झापेक्षाही स्वस्त,नीचांकी दराने शेतकऱ्यांची थट्टा

सामना ऑनलाईन, नागपूर

शेतकरी शेतमालाला योग्य भाव मिळावा म्हणून घसा फुटेस्तोवर ओरडतोय, मात्र त्याकडे लक्ष न दिल्यानं शेतमालाला नीचांकी रक्कम मिळण्याचे नवे विक्रम प्रस्थापित व्हायला लागलेत. वर्धा जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर या दराबाबत कहर झालेला बघायला मिळाला. इथे १०० किलो सोयाबीनला फक्त २०० रूपये दर देण्यात आला आहे. आपण जो पिझ्झा खातो त्याचा दरही ३००-४०० रूपयांच्या आसपास असतो, त्याहीपेक्षा कमी दर हा सोयाबीनला मिळताना बघायला मिळतोय.

केंद्रीय कृषीमूल्य आयोगाने सोयाबीनचा हमीभाव ३०५० रुपये प्रति क्विंटल ठरवलाय, पण यंदा राज्यातल्या कुठल्याच कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या हमीभावाने सोयाबीनची खरेदी केला जात नाही. हमीभावापेक्षा कमी दरानं विक्री होत असेल तर सरकारी हस्तक्षेपाची गरज असते. पण सरकार हस्तक्षेप करत नसल्यानं बाजारात शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. एक क्विंटल सोयाबीनसाठी शेतकऱ्याला उत्पादनापासून बाजारात आणेपर्यंत साधारणपणे ४ हजार रुपये खर्च येतो.

विदर्भात अनेक ठिकाणी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान केलं. तयार झालेलं सोयाबीन या पावसामुळे काळवंडलं आहे साहजिकच आहे, ते खरेदी करायला कोणी तयार नाही, यामुळे काही शेतकरी मिळेल तो दर पदरात पाडून सोयाबीन विकून टाकतायत तर काही शेतकरी जवळपास फुकटात सोयाबीन देण्यापेक्षा ते गुरांना खायला घालत आहेत.