ताडोबा व वनव्याप्त गावात जाण्यासाठी शंभर रुपये शुल्क, नागरिकांचा संताप

सामना प्रतिनिधी । चंद्रपूर

ताडोबा आणि परिसरातील वनव्याप्त गावात जाण्यासाठी आता लोकांना शंभर रूपये मोजावे लागणार आहेत. ताडोबा व्यवस्थापनाने हा निर्णय घेतला आहे. वनविभागाच्या या अजब निर्णयानं नागरिकांमध्ये असंतोष व्यक्त होत आहे.

चंद्रपूरवरून ताडोबाकडे जाणा-या मार्गावरील पद्मापूर द्वार आणि मामला व बोर्डा या गावाकडे जाणा-या मार्गांवर सध्या असे नाके तयार करण्यात आले आहेत. हे वनविभागाचे नाके आहेत. जंगलातील गावात जाणा-या सार्वजनिक मार्गांवर हे नाके निर्माण करण्यात आले असून, या गावाकडे जाणा-या प्रत्येक नागरिकाला चारचाकीसाठी शंभर रुपये, तर दुचाकीसाठी 25 रुपये द्यावे लागणार आहेत. गावातील नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे. मुळात जो मार्ग गावाला जाण्यासाठी सार्वजनिकरित्या बांधण्यात आला, त्यावरून जाण्यासाठी पैसे आकारण्याचा वनविभागाचा निर्णय अन्यायकारक असल्याने लोकांमध्ये असंतोष वाढत आहे. लोकांनी विरोधाचा सूर आळवल्यावर वनविभागाने आता सारवासारव सुरू केली असून, जंगलात जाणा-या जोडप्यांची संख्या वाढल्यानं हे पाऊल उचलावे लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कॅमेरावर बोलण्यास अधिकारी तयार नाहीत. हा निर्णय आठ दिवसांपूर्वी घेण्यात आला. त्यानंतर वन्यजीवप्रेमींनी वनविभागाला निवेदन देऊन नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन केले. मात्र, अजूनही वनविभागाने त्याची माहिती दिलेली नाही. त्यामुळं प्रवेश शुल्क कुणी भरायचे आणि कुणी नाही, याबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.

मुळात, संपूर्ण चंद्रपूर जिल्हाच वनव्याप्त असून, शेकडो गावे जंगलात वसली आहेत. तिथंही वन्यजीव विपुल आहे. मग प्रत्येक गावी, असे शुल्क घेतले जाणार आहे का? आणि ते घेतलं जाणार नसेल, तर ताडोबा व्यवस्थापनालाच त्याची गरज का पडली, असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत