मुंबईकरांसाठी जानेवारीपर्यंत एकूण १०० लोकल फेऱ्या वाढणार

सामना ऑनलाईन । मुंबई

लोकलमधील वाढती गर्दी पाहून रेल्वे मंत्रालयाने येत्या १ ऑक्टोबरपासून ६० नव्या लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यातील ३२ नव्या फेऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार असून १४ फेऱ्या हार्बरवर तर १४ फेऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तर मध्य रेल्वेच्या मेनलाइनवर १ नोव्हेंबरपासून १६ फेऱ्या तर १ जानेवारीपासून आणखी २४ फेऱ्या अशा एकूण शंभर उपनगरीय लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

येत्या १ ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर ३२ नव्या फेऱया चालविण्यात येणार आहेत. त्यात अप दिशेला १७ तर डाऊन दिशेला १५ फेऱ्या वाढविण्यात येणार आहे. याशिवाय ४ फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे. यामध्ये अप दिशेला एक तर डाऊन दिशेला ३ फेऱ्यांचा समावेश आहे.

वेळापत्रकात बदल होणार
सध्या धावत असलेल्या २१ फेऱ्यांच्या वेळात बदल होणार असून १४ फेऱ्यांच्या वेगात वाढ होणार आहे. त्यात सात अप तर सात डाऊन दिशेला धावणाऱ्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्यांची संख्या १३२३ वरून १३५५ इतकी होणार आहे. शुक्रवार, २९ सप्टेंबर रोजी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते नव्या वेळापत्रकाचे उद्घाटन होणार आहे.

– ४ अतिरिक्त फेऱ्या सकाळच्या पिक अकरमध्ये तर ३ फेऱ्या संध्याकाळच्या पिक अवरमध्ये चालविण्यात येणार आहेत.
– अंधेरी ते बोरिवलीदरम्यानच्या नव्या पाचव्या रेल्वे मार्गाकर ९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
– १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या ४२ करून ५४ होणार असून या फेऱ्या रविवारीदेखील धावणार आहेत.