१०० व्या वर्षीही एकही आजार नाही, कोकणातल्या ‘या’ आजीबाईंचं साऱ्यांना कौतुक

2

>> जे . डी . पराडकर । संगमेश्वर

आज भलभल्या व्यक्तींना सुई दोरा-ओवणे जमत नाही डोळ्यांना शक्य होत नाही, लहानग्यांना टीव्हीसमोरबसून जाड भिंगांचे चष्मे लागतात. मात्र कोकणातल्या संगमेश्वर तालुक्यातील मुचरी मोरेवाडी येथील एक आजी वयाच्या १०० व्या वर्षी देखील हे कामं अगदी सहज करतात. त्यामुळे त्या साऱ्यांच्या कौतुकाच्या विषय बनल्या असून १ जुलै रोजी त्यांची शंभरी दणक्यात साजरी करण्यात येणार आहे.

पार्वतीबाई महादेव मोरे या मुचरी मोरेवाडी येथील दुर्गम गावात वास्तव्याला असतात. त्या उद्या १ जुलै रोजी वयाची शंभरी गाठत आहेत. अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि अजातशत्रू ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य. नियमित चालणे, घरातली छोटीमोठी कामं करणे या गुणांच्या जोरावर आजही आपली प्रकृती ठणठणीत असल्याची प्रतिक्रिया पार्वतीबाईंनी दिली.

पार्वतीबाईंचे पती महादेव हे सैन्य दलात सेवेत होते . यामुळे मोरे यांच्या घराण्यातच शिस्त काटेकोर होती . प्रत्येक काम वेळच्यावेळी आणि अंगमेहनतीला म्हणजेच शेतीला मोठं महत्व असल्याने पार्वतीबाईंना हे सर्व सुरुवातीपासून अंगवळणी पडलं होतं. मुचरी गावातील बहुतेक वाड्यांमधील पुरुष सैन्य दलात आजही सेवेत आहेत. या गावाची ती एक परंपरा म्हणून ओळखली जाते. पार्वतीबाईंचं शिक्षण झालं नसलं, तरी त्यांना उपजत असणारं सामाजिक शिक्षण खूप मोठं आहे. स्वभावानं अत्यंत साध्या, माणसाला माणूस जोडण्याचा स्वभाव, परोपकारी यामुळे गावात त्या एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून गणल्या जातात. शेतीची खूप आवड असल्याने आजही त्या शेतीच्या कामात शक्य होइल तेवढी मदत करतात. मनात कोणतेही कपट नाही आणि शक्य होइल तेवढं प्रत्येकाला सहकार्य करण्याचं धोरण असल्याने आपण सर्वांच्या शुभेच्छा आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने शंभरी गाठल्याचे पार्वतीबाई नम्रपणे सांगतात.

गेली ४० वर्षे फॅमिली डॉक्टर असणाऱ्या चंद्रकांत गायकवाड यांच्या दवाखान्यात पार्वतीबाई वर्षातून दोन वेळा तब्येतीची तपासणी आजही करुन घेतात . पार्वतीबाईंना दमा, प्रेशर, डायबेटिस, सांधेदुखी यातील कोणताही आजार नसल्याचे खूद्द डॉ . चंद्रकांत गायकवाड यांनीच सांगितले.

आजही घरात जेवण करायला मदत करणाऱ्या पार्वतीबाई स्वच्छतेच्या भोगत्या असल्याने घरातील केरकचरा स्वतः काढतात. आंघोळीचं पाणीही अन्य कोणाकडून काढून घेत नाहीत. वयोमानामुळे फक्त थोडं ऐकू कमी येत असल्याचे मुलगा भार्गव यांनी सांगितले. नातवंडे, पंतवडे यांच्यासह सून, नातसूना यांच्या लाडक्या असणाऱ्या पार्वतीआज्जींचा वाढदिवस सर्व नातेवाईक उद्या जल्लोषात आणि शभर छत्र्या भेट म्हणून वाटून करणार आहेत.

आमच्या सासूबाईंनी आम्हला कधी सून म्हणून नव्हे , तर मुलगी म्हणूनच अत्यंत प्रेमळपणे वागवलं . संगमेश्वर तालुक्यातील तांबेडी गावात ब्रीद घराण्यात आपलं माहेर, मात्र सासूबाईंनी माहेरची आठवण येणार नाही अशी प्रेमळ वागणूक आजवर दिली. शंभरीच्या वयात त्या जेवण करायला तर मदत करतातच पण सुईमध्ये दोराही ओवून देतात. एवढी काळजी घेणाऱ्या सासूबाई मिळणं हे मी माझं भाग्यच समजते अशी प्रतिक्रिया सुनबाई सुगंधा यांनी व्यक्त केली.