तळीरामांचा माज पोलिसांनी उतरवला, ११४४ वाहनांवर कारवाई

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । पुणे

नवीन वर्षाचे स्वागत करताना दारू पिऊन वेडीवाकडी, आरडओरडा करत गाडी चालविणाऱ्या तळीरामांनी संपूर्ण शहरात पहाटेपर्यंत उन्माद घातला हे पोलिसांच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. ‘दारू पिऊन गाडी चालवू नका’ या पोलिसांच्या अहवानाला काडीचीही किंमत न देणाऱ्या ११४४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली. रॅश ड्रॅव्हींग केल्याने ९२३ जणांना दणका दिला. तर तिबल सिट, नो एंट्रीत प्रवेश, नो पार्किंग करणाऱ्या २ हजार ८३९ जणांवर दंडात्मक कारवाई केली. गेल्यावर्षी धडाकेबाज कामगिरी करत पोलिसांनी तळीरामांचा माज उतरवला.

३१ डिसेंबरची पार्टी करताना ‘दारू प्या, पण दारू पिऊन गाडी चालवू नका’, ‘स्वत:चा आणि दुसऱ्यांचाही जीव धोक्यात आणू नका’ अशी भूमिका अधिकाऱ्यांची होती. दारू पिऊन गाडी चालविल्याने अपघाताची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी ३१ डिसेंबरच्या दोन ते तीन दिवस आधीपासूनच तळीरामांवर कारवाईचा दणका सुरू केला. ३१ डिसेंबरच्या रात्री पुण्यातील महत्वाचे रस्ते, चौक, शहराचे प्रवेशद्वार या ठिकाणी नाकाबंदी केली. दिवसभर करवाई केल्यानंतर रात्री १२ नंतर वाहनांच्या गर्दीने कारवाई आणि नयिमन करताना पोलिसांनी दमछाक झाली. पहाटेपर्यंत ब्रेथ अ‍ॅनलायझरच्या सहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाई झाली आहे.

वाहतूक पोलिसांच्या २८ विभागांमध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह केल्याने १ हजार १४४ वाहनाचालकांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर खटला भरला जाईल. तसेच त्यांचे लायसन्स रद्द करण्यासाठी आरटीओकडे पाठवले जातील. वेडीवाकडी गाडी चालवून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ९२३ जणांवर रॅश ड्राईव्हची कारवाई केली आहे. तर तिबल सिट, राँग साईड, नो पार्किंग, डबल पार्किंग, टिंटेड ग्लास, झेब्रा क्रॉसिंग, विना हेल्मेट असे २ हजार ८३९ जणांवर दंडात्मक कारवाई केली. अशा प्रकारे वाहतूक पोलिसांनी एका रात्री तब्बल ४ हजार ९०६ जणांवर कारवाई करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त अशोक मोराळे म्हणाले, दारू पिऊन गाडी चालविणारे, रॅश ड्रायव्हींग करून धोका निर्माण करणारे आणि इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. गेल्यावर्षी ड्रंक अँड ड्राईव्हच्या ६१५ केसेस केल्या होत्या यावर्षी १ हजार १४४ जणांवर कारवाई केली आहे.