‘त्या’ आदेशाचा अवमान केल्याने 12 बँकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल

53
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी, नगर

दुष्काळी आढावा अनुदान वाटपाच्या बैठकीस दांडी मारल्याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी विविध बँकेच्या 12 अधिकाऱ्यांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीसारख्या गंभीर बैठकीस बँकेच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या गुन्ह्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये आंध्रा बँकेच्या नेहा जोशी, इंडियन बँकेचे मंगेश कदम, चरणदीप, माने, जी. के. देशपांडे, सातपुते, वसंत पिल्लेवार, गोविंद झा, सुयोग ब्राम्हणे, धीरज, विकास निकाळजे यांचा समावेश आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शुक्रवार, दि. 17 मे रोजी दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शेतकरी व दुष्काळ अनुदान वाटप आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. परंतु तब्बल 12 बँकेचे प्रतिनिधी बैठकीस आले नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी शहरातील विविध बँकेच्या 12 अधिकाऱ्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण हे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या