किडनी रुग्णांना बाप्पा पावला! रायगड जिल्ह्याला मिळणार १२ डायलिसीस मशीन

सामना प्रतिनिधी । पनवेल

किडनीच्या आजाराशी झुंज देणाऱ्या रायगड जिल्ह्यातील रुग्णांना बाप्पा पावला आहे. गरजू किडनी रुग्णांना माफक दरात डायलिसीसची सुविधा मिळावी यासाठी सिद्धिविनायक ट्रस्ट जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये १२ डायलिसीस मशिन्स उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे डायलिसीससाठी अलिबाग, पनवेल किंवा मुंबई गाठण्यासाठी होणारी किडनी रुग्णांची फरफट थांबणार आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय वगळल्यास अद्ययावत सोयी, सुविधा असलेली रुग्णालये पनवेल येथेच आहेत. त्यामुळे प्रथमोपचार घेतल्यानंतर डायलिसीससाठी रुग्णाला पनवेल अथवा मुंबई गाठावी लागते. आधीच किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची महागड्या डायलिसीससाठी फरफट होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांना डायलिसीसची सुविधा तेही माफक दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रभादेवीच्या सिद्धिविनायक ट्रस्टने पुढाकार घेतला असून १२ मशीन मिळणार आहेत. लवकरच अलिबाग जिल्हा रुग्णालय, महाड आणि माणगाव येथे प्रत्येकी चार मशीन देण्यात येणार आहेत.

गैरसोय दूर होणार
अलिबाग, मुरुड, रोहा, माणगाव या ठिकाणाहून रुग्णाला पनवेलपर्यंत नेण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचा बिकट रस्ता पार करावा लागतो. शिवाय खर्चदेखील येतो. या तीन भागांत डायलिसीस मशीन आल्यास हजारो रुग्णांची गैरसोय दूर होणार असून पैशांचीही बचत होणार आहे.

‘किडनी रुग्णांची गरज ओळखून डायलिसीस मशीन मोफत देण्याचा सिद्धिविनायक ट्रस्टने निर्णय घेतला आहे. त्यानुसार रायगडात १२ मशीन देण्यात येणार आहेत. भाविकांनी केलेल्या दानातून रुग्णसेवा करण्याचा ट्रस्टचा मानस आहे. कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण होताच डायलिसीस मशीन देण्यात येतील.’
– आदेश बांदेकर, अध्यक्ष, सिद्धिविनायक मंदिर न्यास, मुंबई