किल्ले सिंधुदुर्गवर एका दिवसात विक्रमी १२ हजार पर्यटक

सामना प्रतिनिधी । मालवण

कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाचा ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालवणात नाताळ सुटीच्या पार्श्‍वभूमीवर मोठ्या संख्येने दाखल झालेल्या पर्यटकांनी मालवणनगरीसह किनारपट्टी फुलून गेली आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गावर रविवारी (२४) एका दिवसात १२ हजार या विक्रमी संख्येने पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शहरातील चिवला बीच, बंदर जेटी, रॉकगार्डन परिसर तसेच तारकर्ली, देवबाग, वायरी, तळशील-तोंडवळी, घुमडे याठिकाणीही पर्यटनाचा आनंद लुटण्यास पर्यटकांची मोठी गर्दी होती.

सलग सुट्ट्यांचा विचार करता गेल्या दोन दिवसात येथे मोठ्या संख्येने देशी, विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांची किल्ले सिंधुदुर्गसह स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग ,बनाना राईड, जेटस्की, पॅरासेलिंगचा तसेच अन्य जलक्रीडा प्रकारांचा आनंद लुटण्यास गर्दी झाली होती. आजही किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी हजारो पर्यटकांची गर्दी बंदर जेटीवर झाल्याचे दिसून आले. बंदर जेटी परिसर पर्यटकांच्या वाहनांनी फुलून गेला होता. दांडी येथे साकारण्यात आलेल्या दांडी सी वॉटरपार्कच्या ठिकाणीही पर्यटकांची मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बंदर जेटी परिसर पर्यटकांनी फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.

शहरात पर्यटकांसह राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सहली दाखल झाल्या आहेत. चिवला बीच समुद्रात विविध शाळकरी मुले आज समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यात मग्न असल्याचे दिसून आले. पर्यटकांच्या आगमनामुळे शहरासह परिसरातील तसेच तारकर्ली, देवबाग या भागातील रिसॉर्ट, निवास न्याहारी फुल झाल्या आहेत. पर्यटकांच्या निवार्‍याअभावी गैरसोय होऊ नये यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हॉटेल्स, लॉजिंग, निवास न्याहारी तसेच अन्य पर्यटन व्यावसायिकांचा व्यवसाय तेजीत आहे. खानावळीमध्ये साडे अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत जेवणावळी सुरू असल्याचे चित्र आहे. मासळीचे दर आवाक्यात असल्याने मत्स्य खवय्यांची चांगलीच चंगळ झाली आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे बाजारपेठेतही लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे.

घुमडे येथिल कृषी पर्यटनही फुल

मालवण शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर डोंगर कुशीत वसलेले घुमडे हे छोटेसे गाव. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या या गावात पर्यटन भाऊ सामंत यांनी ‘स्पाईस व्हिलेज’च्या माध्यमातून ग्रामीण पर्यटनाचे नवे दालन उभे केले आहे. मसाल्याची शेती तसेच फळे व फुलझाडे यांच्या बागा त्या बरोबर खळाळून वाहणारा वहाळ येथील प्रमुख आकर्षण आहे.

… तर किल्ले दर्शन बंद राहणार

किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसदर्भात ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवणार असल्याचे जाहीर केले होते. याप्रकरणी मेरीटाईम बोर्डाकडून किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्या मागण्यांवर अद्यापपर्यंत ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेने ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत किल्ला प्रवासी वाहतूक बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी आज स्पष्ट केले आहे.