एसटीचे १२६९ कर्मचारी आज होणार रिटायर

सामना ऑनलाईन,मुंबई

राज्याच्या ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱया एसटी महामंडळाचा ६९ वा वर्धापनदिन एकीकडे १ जून रोजी साजरा होत असतानाच ३१ मे रोजी महामंडळाचे तब्बल १२६९ कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याने याला एसटीची ओहोटी म्हटल्यास वावगे ठरू नये. आपल्या ताफ्यातील १८ हजारांहून अधिक बसगाडय़ा, राज्यातील २५० आगार व ६०९ बसस्थानके, लाखभर कर्मचारी असा मोठा गाडा सांभाळणारी एसटी आशियातील सर्वात मोठी सार्वजनिक परिवहन सेवा मानली जाते.

सुमारे २०० कोटींची देणी

एसटीच्या कर्मचाऱयांमध्ये ३१ मे रोजी निवृत्त होणाऱया कर्मचाऱ्यांमध्ये १२६९ कर्मचाऱयांना निवृत्तीनंतर त्यांच्या पीएफपोटी १४६ कोटी व ग्रॅच्युइटीसाठी ८० कोटी रुपये असे एकूण मिळून सुमारे २२६  कोटी रुपये रक्कम महामंडळाला द्यावे लागणार आहेत.