बेस्टचे 1270 इलेक्ट्रिक पोल धोकादायक, कधीही उन्मळून पडू शकतात

सामना प्रतिनिधी, मुंबई

जीर्ण इमारती, पोखरलेली झाडे, जुने पूल याबरोबरच आता मुंबईत बेस्टचे इलेक्ट्रिक पोलदेखील धोकादायक बनले आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर तब्बल 1270 पोल अत्यंत गंजलेल्या अवस्थेत उभे असून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात अशा स्थितीत असल्याची कबुली खुद्द प्रशासनानेच दिली आहे. हे पोल बदलले नाही तर पोल कोसळून मोठी जीवितहानी होऊ शकते अशीही शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर प्रकाश देण्यासाठी बेस्टतर्फे इलेक्ट्रिक पोल अर्थात मार्गप्रकाश स्तंभ उभारून वीज पुरवठा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून वारा, पाऊस, ऊन झेलत उभे असलेल्या या पोलपैकी बहुतांशी पोल गंजलेल्या अवस्थेत असल्याचे बेस्टच्या अधिकाऱयांनी केलेल्या पाहणीत आढळून आले आहेत. हे पोल बदलण्यासाठी नवीन पोलच्या खरेदीचा प्रस्ताव नुकताच बेस्ट समितीमध्ये मंजूरीसाठी आला होता. त्यावेळी 5000 पोलच्या खरेदीसाठी समिती सदस्यांनी मंजुरी दिली.

5000 नवीन पोल खरेदी करणार
इलेक्ट्रिक पोलच्या खरेदीसाठी यापूर्वी अलविनो एनर्जी सोल्युशन या कंपनीला कंत्राट देण्यात आले होते, मात्र कंपनीने पोलचा पुरवठाच न केल्यामुळे व कंपनीने बेस्टच्या मागणीप्रमाणे स्तंभ न दिल्यामुळे पोलची प्रचंड टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे गंजलेले पोल बदली करण्याचे काम रखडल्याचे प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे अशा गंजलेल्या पोलबरोबरच ज्या पोलचे आयुष्य संपलेले आहे असे पोल मिळून 5000 पोल बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

रस्त्यांवरील इलेक्ट्रिक पोल हे 5 मीटर, 7 मीटर, 9 मीटर उंचीचे असतात.
दर तीन महिन्यांनी हे पोल रंगवले जातात, तर पोलच्या पायथ्याशी असलेले सिमेंट तपासून पाहले जाते.
मुंबईतील एकूण पथदिवे – 1 लाख 22 हजार
बेस्टचे पथदिवे – 33 हजार
पथदिव्यांचे आयुष्य – 15 वर्षे

summary- 1270 electricity poles of best are dangerous