बारावीच्या परीक्षेपूर्वी तीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

सामना ऑनालाईन । नगर

बुधवारपासून सुरू होणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेपूर्वी तीन विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला आहे. मंगळवारी नगर-कल्याण रोडवर कार आणि मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले आहेत. सोमनाथ बाळासाहेब गांगुर्डे (१८), दिपक रंगनाथ गांगुर्डे (१८) आणि प्रतीक बाळासाहेब ठाणगे (१९) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील वडगाव आमली परिसरामध्ये हा अपघात झाला. नगरवरून भाळवणीला जात असताना विरुद्ध दिशेने आलेल्या वेगावर नियंत्रण नसलेल्या कारने (क्र. एम.एच. ०३ सी पी ०१४४) मोटारसायकलवरील (क्रमांक एम.एच. १६ बी. टी. २६२२) दिपक (माळकूप), सोमनाथ आणि प्रतिक (रा. हिवरे कोरडा) यांना जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांनाही उपचारासाठी नगरला हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिघेही मृत झाल्याचे घोषित केले. अपघातामध्ये कारचालकही जखमी झाल्याचं वृत्त आहे.