१३ वर्षांच्या मुलीने दिला बाळाला जन्म, आत्याचा नवरा करत होता अत्याचार

सामना ऑनलाईन । नागपूर

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १३ वर्षीय मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. आत्याच्या नवऱ्याने या मुलीवर बलात्कार केला असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून विजय नहारकर असे त्याचे नाव आहे.

पीडित मुलगी चार वर्षांची असतानाच तिच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर तिच्या संगोपनाची जबाबदारी आत्याने स्वीकारली. आत्याच्या नवऱ्याने या मुलीला घरातून हाकलवून देण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करायला सुरूवात केली. निराधार होण्याच्या भितीने पीडित मुलगी अत्याचार सहन करत राहीली. परंतु, ती गर्भवती राहिल्याने तिच्या आत्याला आणि इतर नातेवाईकांना हा प्रकार कळाला. बदनामीच्या भितीने त्यांनी पोलिसांत तक्रार देणे टाळले. या मुलीने बाळाला जन्म दिल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला यामुळे पीडित मुलीने विजय नहारकरच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा गुन्हा राणा प्रतापनगर पोलिसांत दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.