कमला मिल कंपाऊंडमधील हॉटेलला भीषण आग

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबईतील लोअर परळ भागात असलेल्या अत्यंत प्रसिद्ध कमला मिल कंपाऊंडमधील मोजो टेरेस नावाच्या हॉटेलमध्ये भीषण आग लागली, हे हॉटेल लंडन टॅक्सी रेस्टोबारच्या वरच्या बाजूला आहे. ही आग इतकी भीषण होती की यामध्ये आत्तापर्यंत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत

प्रिती राजानी, तेजल गांधी, कविता धोरानी, किंजल शहा, प्रमिला केनिया, शेफाली जोशी, पारुल खुशबू, मनिषा शाह, प्राची शाह, प्राची खेतान, यश ठक्कर, सरबजित परेडा, धैर्य ललानी, विश्व

आम्ही जेव्हा आज सकाळी अग्निशमन दलाकडे आगीबद्दल विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितले की आज आटोक्यात आली असली तरी ती पूर्णपणे विझलेली नसून ती लवकरच विझवण्यात येईल. रात्री साडेबाराच्या सुमारास ही आग लागली होती जी विझवण्यासाठी ८ फायर इंजिन, ८ पाण्याचे टँकर आणि शिडी असलेल्या मोठ्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या.

घटनेची चौकशी होणार

या दुर्घटनेची सखोल चौकशी होणार असून ही आग नेमकी का लागली याचं कारण चौकशीनंतरच कळू शकेल. या दुर्घटनेची माहिती मिळताच युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वत: घटनास्थळी उपस्थित असलेल्या महापालिका आयुक्त अजॉय मेहता, शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे, सभागृह नेते यशवंत जाधव यांच्याशी संपर्क साधला आणि परिस्थितीची माहिती घेतली


या दुर्घटनेत आत्तापर्यंत १४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील ८ जण अत्यवस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे.