बुलडाण्यात चोरीला गेलेल्या बोकडांची किंमत ऐकाल तर हादरून जाल

सामना ऑनलाईन, बुलडाणा

चोरटे एका रात्रीत मालामाल होण्यासाठी सोनं,चांदी, हिरे दागिने लुटतात, मात्र बुलडाण्यात चोरांनी १४ बोकड चोरून नेले आहेत. चोरून नेलेल्या बोकडांची किंमत ही महागड्या गाड्यांपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे या बोकडांचा मालक उध्वस्त होण्याच्या मार्गावर  आहे. ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील आहे. इथल्या नंदनवन गोट फार्ममध्ये ही चोरी करण्यात आली आहे.

जे बोकड चोरी करण्यात आले आहेत त्यांना बाजारात चांगला भाव मिळतो, बाजारभावानुसार या प्रत्येक बोकडाची किंमत कमीतकमी १ लाखाच्या घरात आहे. या बोकडांच्या रक्षणासाठी २ कुत्रे ठेवण्यात आले होते, त्यांना ठार मारून चोरड्यांनी बोकड पळवले आहेत. महागड्या बोकडांना चोरून नेण्याची ही  लोणार शहरातील गेल्या महिन्याभरातील दुसरी घटना आहे.