गुन्हा घडल्यावर तपास कसला करताय, आधी काय केले?- महिला खासदार

सामना ऑनलाईन । मुंबई

गुन्हा घडल्यावर तपास कसला करताय, आधी काय केले? अशा शब्दांत महिला खासदारांनी मंजुळा शेट्य़े हिच्या हत्येप्रकरणावरून तुरुंग प्रशासनाला चांगलेच झापले. पंधरा खासदारांच्या महिला सबलीकरण समितीने आज भायखळा तुरुंगाला भेट दिली. खासदारांनी तुरुंगातील कैद्यांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि तुरुंग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.

केंद्राच्या महिला सबलीकरण समितीच्या अध्यक्षा बिजोया चक्रवर्ती या 15 महिला खासदारांसह आज सकाळी भायखळा येथील तुरुंगात दाखल झाल्या. त्यांनी प्रत्येक बॅरकमध्ये जाऊन महिला कैद्यांची विचारपूस केली. यावेळी आपल्या समस्या सांगण्याबरोबरच बहुतांश कैद्यांनी २३ जूनला तुरुंगात घडलेला प्रसंग खासदारांना सांगितला. पोलिसांनी आमच्या वॉर्डनला मारले, असा आरोपच कैदी करत होत्या. कैद्यांशी बोलल्यावर महिला खासदारांची जेल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत मंजुळा शेट्य़े हत्या प्रकरणाबद्दल विचारले असता अधिकाऱ्यांनी क्राइम ब्रँच तपास करीत असून सहा जणींना अटक झाल्याचे सांगितले. यावर महिला खासदारांनी जेल प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. कैद्यांच्या तक्रारी आहेत, त्यावर काय करता? गुन्हा घडल्यावर तपास कसला करताय, त्याआधी काय केले, असा सवाल यावेळी करण्यात आला.

आरोपींना आज न्यायालयात हजर करणार
वॉर्डन मंजुळा शेट्य़े हिच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या जेलर मनीषा पोखरकर आणि महिला कॉन्स्टेबल बिंदू नाईकडे, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, आरती शिंगणे यांची पोलीस कोठडी उद्या शुक्रवारी संपत आहे. त्यामुळे सर्व आरोपींना महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे.

तुरुंग अधीक्षक इंदुरकर अडचणीत येणार?
मंजुळाचा मृत्यू झाला त्यावेळी तुरुंग अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर हे सुट्टीवर होते. मात्र या घटनेची त्यांना तत्काळ माहिती देण्यात आली. इतकी गंभीर घटना असूनही जबाबदार अधिकारी असताना ते दुसऱ्या दिवशी सायंकाळी घटनास्थळी पोहचले. विशेष म्हणजे त्यांनी वरिष्ठांना याबाबत वेगळीच माहिती दिल्याने त्यांनाही प्रकरणाचे गांभीर्य समजले नाही. कर्तव्यातील हलगर्जीपणामुळे तेही अडचणीत येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंजुळा संध्याकाळच्या गिणतीत नव्हतीच!
तुरुंगात सकाळ आणि संध्याकाळ अशी दोन वेळा कैद्यांची गिणती होते. संध्याकाळी ड्य़ुटीवर येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोर कैद्यांची गिणती झाल्यानंतर आधीचे अधिकारी व कर्मचारी तुरुंग सोडतात. पोखरकर आणि इतर आरोपींनी गिणतीमध्ये मंजुळा होती, असा दावा केला आहे मात्र तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती गिणतीमध्ये नव्हती.

दोन तास झाडाझडती
महिला सबलीकरण समितीच्या १५ सदस्या सकाळी साडेदहाच्या सुमारास तुरुंगात पोहचल्या. कैद्यांची तक्रार ऐकल्यानंतर त्यावर काय उपाययोजना केल्या याबाबत तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विचारणा केली. तुरुंग परिसरातील स्वच्छता, कैद्यांना पुरविल्या जाणाऱया सोईसुविधा, त्यामध्ये असलेली कमतरता याची माहिती करून घेतली. सुमारे दोन तासांच्या झाडाझडतीनंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास महिला खासदार तुरुंगाबाहेर पडल्या.