बुधवार ठरला घातवार, २४ तासांत १५ लोकल बळी

सामना प्रतिनिधी । मुंबई

उपनगरीय लोकल मार्गावर पुन्हा बुधवारी १७ मे रोजी एकाच दिवसांत विविध अपघातांत १५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रविवारी एकाच दिवसात तिन्ही मार्गांवर विविध अपघातांत १६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यापैकी मध्य रेल्वेच्या हद्दीत ११ तर पश्चिम रेल्वेच्या हद्दीत चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलांचादेखील समावेश झाला आहे.

कुर्ला व डोंबिवली येथे प्रत्येकी ३, कल्याण व अंधेरी येथे प्रत्येकी दोन, तर वडाळा रोड, वाशी,पनवेल, वांद्रे आणि बोरीवली येथे प्रत्येकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. रेल्वेचे अपघात रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजना कुचकामी ठरत आहेत. अचानक मृत्यूंच्या संख्येत झालेली वाढ रेल्वे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. अलीकडेच २४ जानेवारी रोजी १६ जणांचा तर २ फेब्रुवारी रोजी १४ जणांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता. तर मागील १७ दिवसांमध्ये तब्बल १६५ जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचे रेल्वे पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे.