क्रिकेटमधला सुपरस्टार, ४ षटकांत शून्य धावा देत घेतल्या १० विकेट

सामना ऑनलाईन । जयपूर

टी-२० क्रिकेटमध्ये अनेकदा फलंदाज गोलंदाजांची धुलाई करतात. पण जयपूरमधील एका सामन्यात दिशा अकादमीचा वेगवान गोलंदाज आकाश चौधरी याने आख्ख्या संघालाच गारद केले. त्याने चार षटकांत शून्य धावा देत १० विकेट घेण्याचा पराक्रम केला.

जयपूरमध्ये टी-२० स्पर्धेत पर्ल अकादमी विरुद्ध दिशा अकादमी असा सामना सुरू होता. पर्ल अकादमी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिशा अकादमी संघाने २० षटकांत १५६ धावा केल्या. पर्ल अकादमी संघ १५७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला आणि ३६ धावांतच गारद झाला. दिशा अकादमीचा वेगवान गोलंदाज आकाश चौधरी याने चार षटकांत शून्य धावा देत १० फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पहिल्याच षटकात त्याने पर्ल अकादमी संघाला दोन धक्के दिले. दुसऱ्या षटकात दोघांना आणि तिसऱ्या षटकात आणखी दोघांना त्याने बाद केले. अखेरच्या षटकात हॅट्ट्रिकसह चार फलंदाजांना तंबूत धाडून आकाशने नवा विक्रम केला.

आकाश मूळचा राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील आहे. त्याच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.