जालन्यात शॉर्टसर्किटमुळे १६ एकर ऊस जळून खाक

सामना प्रतिनिधी । जालना

घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे शुक्रवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटल्याने विजेच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ऊसाच्या शेताला आग लागली. या आगीत १२ शेतकऱ्यांचा १६ एकरमधील ऊस पूर्णपणे जळून खाक झाला आहे. एक महिन्याच्या आत सर्वांच्या ऊसाला तोड मिळणार होती. मात्र तोडणी आधीच मोठ्या मेहनतीनं जोपासलेला या शेतकऱ्यांचा उस जळून खाक झाला आहे.

जळालेल्या ऊस मध्ये दौलत गाभड यांचा ३ एकर, बाळासाहेब जिरे यांचा अर्धा एकर, परसराम जिरे यांचा अर्धा एकर, गुलाब जिरे यांचा अर्धा एकर, रमेश गाभड यांचा दीड एकर, गणेश गाभड यांचा १ एकर, राम गाभड यांचा १ एकर, भागवत गाभड यांचा १ एकर, रवींद्र गाभड यांचा दीड एकर, अर्जुन पंडुरे यांचा दीड एकर, शेख पापा यांचा २ एकर, भीमराव बरगे यांचा २ एकर ऊस जळून गेला आहे. हे सर्व शेतकरी अल्पभूधारक असून काबाडकष्ट करून मोठ्या मेहनतीने त्यांनी ऊस जोपासला होता.

दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल झाल्याने आज सकाळपासून सोसाट्याचा वारा सुटला होता. या वाऱ्यामुळे शेतातून गेलेल्या विद्युत तारांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या उडाल्याने ऊस पेटला. भर उन्हात ऊस पेटल्याने आग विझविता आली नाही. काही मिनिटांत जळून खाक झाला. दरम्यान जळालेल्या ऊसाला टनामागे शंभर रुपये भाव कमी मिळतो. तसेच सरासरी एकरी ७० टन उत्पन्नातुन एकरी १० टनाचे नुकसान गृहीत धरल्यास शेतकऱ्याला एकरी एकूण २८ ते ३० हजाराला फटका बसतो. जर कारखान्याने ऊस नेलाच नाही तर एकरी दीड लाख रुपयांचे नुकसान शेतकरयाला सोसावे लागणार आहे. दरम्यान या घटनेचा पंचनामा करून शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीकडुन नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.