5 वर्षात 16 पक्षांचा ‘रालोआ’ला रामराम, आणखीही पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत


सामना ऑनलाईन । मुंबई

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मात्र ही निवडणूक भजपला चांगलीच जड जाणार असल्याचे दिसत आहे. 2014 ची लोकसभा निवडणूक लढवताना भाजपने 28 घटक पक्षांना सोबत घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मोट बांधली होती. या निवडणुकीत भाजपचे 282 आणि 22 घटक पक्षांचे 54 खासदार विजयी झाले होते. मात्र आता परिस्थिती बरीच बदलली असून चार वर्षांपूर्वी भाजपसोबत असलेल्या 22 पैकी 16 घटक पक्षांनी रालोआला  रामराम ठोकला आहे.

2014च्या लोकसभा निवडणुकीवेळी  भाजपने 28 घटक पक्ष आणि निवणुकीनंतर 14 अशा एकूण 42 पक्षांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामावून घेतले होते. आघाडी करतेवेळी भाजपने या घटक पक्षांना दिलेली आश्वासने पाळली नाही. तसेच घटक पक्षांना ‘गृहित’ धरल्यामुळे 16 पक्षांनी रालोआमधून बाहेर पडणे पसंत केले. नुकतंच आसाम गण परिषदेने नागरिकत्वाच्या विधेयकावरून काडीमोड घेतला असून या अगोदर, चंद्राबाबूंची तेलगु देसम पार्टी, नागा पीपल्स फ्रंट, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांची हिंदुस्तान अवाम मोर्चा, गोरखा जनमुक्ती मोर्चा यांच्यासह जम्मू कश्मीरमधील पीडीपीनेही भाजपसोबतची आघाडी मोडली होती. तामिळनाडूमध्ये एमडीएमके, डीएमडीके तसेच पीएमके यांनीही रालोआला बायबाय केले असून आदिवासी नेते सी. के. जानू यांच्या जनाधिपत्य राष्ट्रीय सभा आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन रालोआला सोडचिठ्ठी दिली आहे. याचसोबत आणखी अनेक घटक पक्षांचा हिरमोड झाल्याने त्यांनी रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.