४३४ शेतकऱ्यांना १७ कोटींचे अनुदान

सामना ऑनलाईन । जळगाव

एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत शेतीसाठी जिह्यातील ४३४ शेतकऱ्यांना १७ कोटी २७ लाख १५ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. या कार्यक्रमामुळे शेती उत्पादन क्षमता वाढत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यास मदत होत आहे.

फलोत्पादन क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्त्वाकांक्षी अभियानाची सुरुवात केली होती. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. यासाठी गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्माण करणे, नवीन फळबागांची लागवड करणे, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे, सामूहिक शेततळय़ांच्या माध्यमातून सिंचन क्षमता वाढविणे, हरितगृह, शेडनेटहाऊसमध्ये नियंत्रित शेती करणे, एकात्मिक अन्नद्रव्ये व एकात्मिक किड व्यवस्थापन, सेंद्रीय शेती, मनुष्यबळ विकास, काढणीत्तोर व्यवस्थापन या बाबींसाठी अर्थसाहाय्य देण्यात येते. अनुदानाची क्षेत्र मर्यादा एक हजार चौरस मीटर करून ४ हजार चौरस मीटरपर्यंत वाढविली आहे.

या कार्यक्रमांतर्गत शेतीसाठी जिल्हय़ातील ४३४ शेतकऱयांना १७ कोटी २७ लाख १५ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सामूहिक शेततळय़ांसाठी २८७ शेतकऱयांना ६ कोटी ६३ लाख ६१ हजार रुपये, शेडनेटसाठी ५७ शेतकऱ्यांना २ कोटी ५८ लाख ३७ हजार रुपये तर हरितगृहासाठी ९० शेतकऱ्यांना ८ कोटी ५ लाख १७ हजार रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.