भाजपला पाठिंबा देणार्‍या राष्ट्रवादीचे 18 नगरसेवक पक्षातून बडतर्फ


सामना ऑनलाईन । नगर

नगर महानगरपालिकेत भाजपला पाठिंबा दिल्या प्रकरणी 18 राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बडतर्फ केले आहे. अधिकृत पत्र पाठवून तसे त्यांनी आदेशच दिले आहेत.

18 डिसेंबर रोजी नगरच्या महापौर निवडणूकीत जातीयवादी पक्षाला पाठिंबा देऊ नका असे स्पष्ट आदेश राष्ट्रवादी पक्षाकडून नगरसेवकांना देण्यात आले होते. तरी या पक्षाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपला महापौर निवडणूकीत पाठिंबा दिला होता. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत सात दिवसांत उत्तर देण्यास नगरसेवकांना सांगितले होते. सात दिवसातही या नगरसेवकांनी उत्तर न दिल्याने जयंत पाटील यांनी कडक पाऊल उचलत या 18 नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फक्त नगरसेवकांनाच बडतर्फ केले नसून जिल्हाध्यक्षांवरही कारवाई केली आहे. अशा प्रकारच्या पक्षविरोधी घडामोडी होत असताना जिल्हाध्यक्षांनी पक्षश्रेष्ठींना कल्पना न दिल्याबद्दल  जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांचीही जयंत पाटील यांनी हकालपट्टी केली आहे.

नगर : बसपाच्या ‘त्या’ चार नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई  

यापूर्वी बसपनेही आपल्या चार नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली होती. बसपच्या चार नगरसेवकांनी भाजपला महापौर पदासाठी पाठिंबा दिला. या प्रकरणी बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी पक्षविरोधी कारवाई केली म्हणून या चार नगरसेवकांचे निलंबन केले होते.